माणसाने सात्विक भावाने कर्मे करावीत
अध्याय चौथा
बाप्पा म्हणाले, सर्व जगाची निर्मिती आणि संचालन मायारुपी शक्तीच्या सहाय्याने होत असते. त्यात माझा काहीही सहभाग नसतो. मी जरी कर्ताकरविता आहे असे लोक म्हणत असले तरी प्रत्येक मनुष्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मानुसार ह्या जन्मी त्याची वाटचाल कशी होणार हे नियती ठरवत असते. त्यानुसार त्याला त्रिगुणांपैकी आवश्यक त्या गुणाचे प्राबल्य असलेला स्वभाव व घराणे प्राप्त होते. कुठं जन्म घ्यायचा, काय काम करायचं हे सर्व जर पूर्वनियोजित असलं तरी सदैव ईश्वरस्मरण करत मिळालेलं काम निरपेक्षतेनं करणं आणि स्वत:चा उध्दार करून घेणं हे माणसाच्या हातात आहे. त्याला आपल्या आत्म्याचा आपणच उद्धार करणे असे म्हणतात.
हे करत असताना त्याला काही अडचणी आल्या तर त्या सुसह्य करायचं काम मात्र मी करत असतो. स्वत:च स्वत:चा उध्दार करावा असं जरी सांगितलं असलं आणि ते पटतही असलं तरी माणसं बाप्पांनी किंवा भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे का वागत नाहीत याचं उत्तर बाप्पा पुढील श्लोकात देत आहेत.
कस्यचित्पुण्यपापानि न स्पृशामि विभुर्नृप ।
ज्ञानमूढा विमुह्यन्ते मोहेनावृतबुद्धयऽ ।। 14 ।।
अर्थ- हे नृपा, मी सर्वव्यापी आहे तरी कोणाच्याही पुण्याला अथवा पापाला स्पर्शही करीत नाही. मोहाने बुद्धि आच्छादित झालेले ज्ञानहीन लोक मोह पावतात.
विवरण- बाप्पा म्हणतात, राजा मी सर्वव्यापी जरूर आहे पण कोणाच्याही पुण्याला अथवा पापाला स्पर्शही करीत नाही. मनुष्याच्या वाट्याला कोणतं कर्म यावं आणि ते त्यानं कसं करावं या दोन्ही गोष्टी माझ्या हातात नाहीत. पूर्वकर्मानुसार त्याचं याजन्मीचं कार्य नियती ठरवत असते आणि ते फळाच्या अपेक्षेनं करायचं की, निरपेक्षतेनं करायचं हे ठरवण्याचे स्वातंत्र्य मात्र माणसाला असते. ज्याला हे माहित असतं की फळाच्या अपेक्षेने कर्म केले की तो कर्मबंधनात अडकतो, त्याला मुमुक्षु असं म्हणतात. बहुतेक लोकांना ह्या सर्व यंत्रणेची माहिती नसल्याने ते फळाच्या मोहात पडून, फळाच्या अपेक्षेनं कर्म करतात. त्यामुळे त्यातून पाप पुण्याची निर्मिती होते व त्यानुसार त्याच्या पुढील जन्माची जुळणी होत राहते. जर त्यानं फळाचा मोह झुगारून निरपेक्षतेनं कर्म केलं, तर पाप पुण्याचा हिशोब होत नसल्याने तो मुक्त होण्यास पात्र होतो. हे सर्व लक्षात घेऊन लोकमान्य गीतारहस्यात म्हणतात, माणसाचा स्वभाव त्यानं कसं वागायचं हे ठरवत असतो परंतु जन्मजात कोणता स्वभाव मिळावा हे त्याच्या हातात नसतं. त्याच्या स्वभावात सत्व गुणाचे प्राबल्य असेल तर तो निरपेक्षतेने कर्म करेल. जर त्याच्या स्वभावात रजोगुण जास्त असेल तर तो फळाच्या मोहात पडेल. तमोगुणी मनुष्य इतरांना व स्वत:ला त्रास होईल असे वागेल. म्हणून ज्याला जसा स्वभाव मिळाला असेल तसा त्याने स्वीकारावा आणि स्वत:चा उद्धार होण्याच्या दृष्टीने सात्विक मनुष्य वागतो त्याप्रमाणे निरपेक्षतेने कर्म करावे.
जर मनुष्याच्या हे लक्षात आले की, आपला देह ही आपली खरी ओळख नसून आपण आत्मस्वरूप आहोत तर त्याला तर त्याला श्रेष्ठ ज्ञान प्राप्त होतं असं बाप्पा पुढील श्लोकात सांगत आहेत.
विवेकेनात्मनोऽ ज्ञानं येषां नाशितमात्मना ।
तेषां विकाशमायाति ज्ञानमादित्यवत्परम् ।। 15।।
अर्थ- ज्यांचे आत्म्याविषयीचे अज्ञान विवेकाने आणि आत्मज्ञानाने नाश पावलेले आहे त्यांच्या ठिकाणी श्रेष्ठ परमज्ञान सूर्याप्रमाणे विकास पावते.
विवरण- मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे स्वत:चा उद्धार करून घेण्याच्या दृष्टीने जो मनुष्य निरपेक्षतेने कर्म करत असतो त्याच्या हळूहळू हे लक्षात येते की, कर्ता करविता ईश्वर असून तो त्यानं दिलेल्या प्रेरणेनुसार कार्य करत आहे.
क्रमश: