For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सिद्धिचा उपयोग स्थिरबुद्धी पुरूष लोककल्याणासाठी करतो

06:09 AM Dec 04, 2025 IST | Tarun Bharat Portal
सिद्धिचा उपयोग स्थिरबुद्धी पुरूष लोककल्याणासाठी करतो
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, स्थितप्रज्ञ इंद्रियांनी कोणती प्रलोभने दाखवायची, कोणती नाहीत हे ठरवतो आणि त्याबरहुकूम ती काम करतात. सर्व भूतमात्रांची जेव्हा रात्र असते, त्यावेळी संयमी पुरुष जागा असतो व ज्याठिकाणी प्राणिमात्र जागृत असतात त्यावेळी ज्ञानवान मुनी निद्रेत असतात.

ज्या पुरुषाला भोगांची अपूर्वाई नसते त्याला परमशांती प्राप्त होते ह्या अर्थाचा  न भंग पावे भरता हि नित्य । समुद्र घेतो जिरवूनि पाणी? जाती तसे ज्यात जिरूनि भोग । तो पावला शांति न भोग-लुब्ध ।। 70।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. त्यानुसार समुद्राप्रमाणे स्थितीप्रज्ञ पुरुष स्थिर असतो. समुद्रात नेहमीच अनेक नद्या अखंड पाणी आणून टाकत असतात, पण त्यामुळे तो किंचितही मोठा होत नाही व आपल्या मर्यादेचे उल्लंघन करत नाही किंवा उन्हाळ्यात सर्व नद्यांचे प्रवाह आटले, तरी तो मुळीच कमी होत नाही, त्याप्रमाणे ऋद्धिसिद्धि जरी प्राप्त झाल्या तरी स्थिरबुद्धी पुरूषाच्या बुद्धीला हर्ष होत नाही आणि त्या प्राप्त झाल्या नाहीत तरी त्याला असंतुष्टता वाटत नाही, तो दु:खीही होत नाही तसेच त्याचे धैर्य कमी होत नाही. तो अंत:करणाने स्वस्वरूपात रमून गेलेला असतो. हे स्वसरूपात रमणे एव्हढे सुखकर असते की, त्याच्या दृष्टीने आजूबाजूला दिसत असलेली भौतिक सुखे अगदीच किरकोळ असल्याने त्याला ती आकर्षक वाटत नाहीत. ज्याप्रमाणे आईच्या कडेवर बसलेल्या ताह्या मुलाला ते सुख सोडून इतर कोणतीही गोष्ट त्या तोडीचे सुख देणारी वाटत नाही त्याप्रमाणे स्वसरूपाचे सुख अनुभवलेल्या स्थिरबुद्धी पुरुषाला वैषयिक आकर्षणे भुरळ पाडू शकत नाहीत. त्यामुळे ती प्रारब्धानुसार मिळाली तर त्याचा आनंद तो घेतो पण ती नसली तरी त्याला फरक पडत नाही.

Advertisement

आत्मसुखात मग्न असलेल्या पुरुषाबद्दल अधिक सांगताना भगवंत म्हणतात, त्याला आजूबाजूचे जग असून नसून सारखेच असते कारण त्याला आजूबाजूच्या वस्तू, व्यक्ती आणि परिस्थिती ह्यापासून कोणतीच अपेक्षा नसते. तो अहंकार आणि सर्व विषय वासना सोडून निरिच्छ, ममत्वशून्य होऊन कर्तव्यकर्म करीत राहतो, त्यामुळे त्याला शांती प्राप्त होते.

सोडूनि कामना सर्व फिरे होऊनि नि:स्पृह । अहंता ममता गेली झाला तो शांति-रूप चि ।। 71 ।।

माउली म्हणतात, सामान्य माणूस कशाच्या ना कशाच्या मागे सतत धावत असतो. त्यामुळे एक इच्छा पूर्ण झाली की, लगेच त्याला दुसरी इच्छा होऊ लागते व ती पूर्ण करण्यासाठी तो धडपडू लागतो. ह्या सतत होणाऱ्या नवनवीन इच्छा तृप्त करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या धावपळीमुळे तो असंतुष्ट असतो परंतु जो आत्मज्ञानाने संतोष पावलेला आणि परमानंदाने पुष्ट झालेला आहे तो स्थितप्रज्ञ असतो. तो दृढपणाने मी कर्ता नाही हे ओळखून, विश्वचैतन्याशी एकरूप होऊन विश्वात वावरतो. शेवटच्या श्लोकात भगवंत सांगतात, एकदा ही अवस्था प्राप्त झाली की, मोह होत नाही. त्यामुळे अंतकाळी देखील या अवस्थेत स्थिर होऊन तो ब्रह्मानंद प्राप्त करून घेतो.

अर्जुना स्थिती ही ब्राम्ही पावता न चळे पुन्हा । टिकूनि अंत-काळी हि ब्रम्ह-निर्वाण मेळवी ।। 72।।

श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, निष्काम पुरुषांना ब्रम्हस्थितीचा एकदा अनुभव आला की ते कायम त्या स्थितीत रहात असल्याने आयुष्याच्या शेवटी त्यांना ब्रह्मनिर्वाण प्राप्त होते. त्यांच्या दृष्टीने आजूबाजूचे जग असून नसल्यासारखेच असल्याने ते सोडून जाताना त्यांना वाईट वाटत नाही. तसेच देहाबद्दल त्याला प्रेम वाटत नसल्याने नशिबात असलेले देहदु:ख ते सहजी सोसू शकतात.

अध्याय दुसरा समाप्त

Advertisement
Tags :

.