पार्टीत चिकनचा तुकडा कमी वाढल्याने चाकू हल्ला करून मित्राचा केला खून
यरगट्टीजवळील शेतवडीत रविवारी रात्री घडला प्रकार
बेळगाव : मित्राच्या लग्नानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत चिकनचा तुकडा कमी वाढण्यावरून झालेल्या वादावादीचे पर्यवसान एका तरुणाच्या खुनात झाले आहे. यरगट्टीजवळील शेतवडीत रविवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून मुरगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. पोलिसांनी त्याच गावातील तरुणाला ताब्यात घेतले आहे. विनोद चंद्रू मलशेट्टी (वय 30) असे खून झालेल्या दुर्दैवी तरुणाचे नाव आहे. त्याचा मित्र विठ्ठल मुदकप्पा हारुगोप्प (वय 28) याने हे कृत्य केले आहे. मुरगोड पोलिसांनी विठ्ठलला ताब्यात घेतले असून खुनासाठी वापरण्यात आलेला चाकूही पोलिसांनी जप्त केला आहे.
यरगट्टी येथील अभिषेक कोप्पद या तरुणाने काही दिवसांपूर्वी लग्न केले. मित्रांसाठी लग्नाची पार्टी आयोजित करण्यात आली होती. गावापासून जवळच असलेल्या शेतवडीत अभिषेकने पार्टी ठेवली होती. या पार्टीमध्ये खून झालेला विनोद व संशयित आरोपी विठ्ठल हे दोघेही गेले होते. सर्वजण जेवण करताना चिकन वाढण्यावरून विनोद व विठ्ठल यांच्यात वादावादी झाली. वादावादीचे पर्यवसान विनोदच्या खुनात झाले. कांदा कापण्याच्या चाकूने विठ्ठलने विनोदवर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विनोदचा जागेवरच मृत्यू झाला. मुरगोड पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. संशयित आरोपी विठ्ठलला ताब्यात घेऊन मुरगोडला नेण्यात आले. मित्राच्या लग्नाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत चिकनवरून एका मित्राने दुसऱ्याचा खून केला आहे.