कपिल शर्माच्या कॅफेमध्ये गोळीबार करणाऱ्यास अटक
दिल्ली पोलिसांची पंजाबमध्ये कारवाई
वृत्तसंस्था/ लुधियाना
कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅप्स कॅफेमध्ये गोळीबार करणाऱ्या आरोपीला दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी पंजाबमधील लुधियाना येथून अटक केली. सदर आरोपीचे नाव बंधू मान सिंग सेखोन असे असून तो गँगस्टर गोल्डी ढिल्लन टोळीचा प्रमुख हँडलर असल्याचे सांगण्यात आले. अटकेदरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून चिनी बनावटीचे एक पीएक्स-3 हाय-एंड पिस्तूल आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली. कपिल शर्माच्या कॅनडामधील कॅफेला आतापर्यंत 10 जुलै, 7 ऑगस्ट आणि 18 ऑक्टोबर अशा तीनवेळा लक्ष्य करण्यात आले आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित गोल्डी ढिल्लन आणि कुलवीर सिद्धू नेपाली यांनी तिन्ही गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली होती.
कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार करणारा संशयित आरोपी सेखोन हा भारतात लपल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्याच्या अटकेसाठी सुरक्षा पथकांकडून हालचाली गतिमान करण्यात आल्या. सेखोनवर गोळीबाराचा कट रचण्याचा आणि गोळीबार करणाऱ्यांना लॉजिस्टिक सपोर्ट पुरवण्याचा आरोप आहे. सेखोन हा भारत आणि कॅनडामधील गुंडांमध्ये बराच काळ दुवा म्हणून काम करत होता. तो गोळीबार, खंडणी आणि धमक्या यासारख्या घटनांमध्ये सहभागी होता. पोलीस आता गोल्डी ढिल्लन टोळीतील इतर सदस्यांची, त्यांच्या निधीच्या माध्यमांची आणि त्यांच्या शस्त्रास्त्र पुरवठा नेटवर्कची चौकशी करत आहेत. ही कारवाई आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध अलीकडील काळात मिळालेले मोठे यश मानले जात आहे.