‘संदेशखाली’ प्रकरणात ममता सुप्रीम कोर्टात
सीबीआय तपासाविरोधात याचिका : आज सुनावणी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संदेशखाली प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात पश्चिम बंगाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी सोमवार, 29 एप्रिल रोजी होणार आहे. न्यायमूर्ती बी. आर. गवई आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार असल्याचे सूचीबद्ध करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाच्या 10 एप्रिल 2024 रोजीच्या आदेशाने पोलीस दलासह संपूर्ण राज्य यंत्रणेचे मनोधैर्य खचल्याचे सर्वोच्च न्यायालयासमोरील आपल्या याचिकेत राज्य सरकारने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने एका सामान्य आदेशात सदर प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण ब्युरोकडे (सीबीआय) देण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयामुळे कोणत्याही दखलपात्र गुन्ह्याचा तपास करण्याचे राज्य पोलिसांचे अधिकार हिरावून घेतल्यासारखे वाटते, असे याचिकेत म्हटले आहे. संदेशखाली येथे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तपास सीबीआयकडून आधीच सुरू असून एजन्सीने 5 जानेवारीच्या घटनांशी संबंधित तीन एफआयआर नोंदवले आहेत.
संदेशखाली येथील महिलांवरील गुन्हे आणि जमीन बळकावण्याच्या आरोपांची चौकशी करून पुढील सुनावणीच्या तारखेला सर्वंकष अहवाल सादर करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हे प्रकरण 2 मे रोजी पुढील सुनावणीसाठी सूचीबद्ध करण्याचे निर्देश देत सीबीआयला त्या दिवशी अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.