यामागुचीकडून मालविका पराभूत
चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन
वृत्तसंस्था/ चांगझाऊ, चीन
भारताची युवा बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची चायना ओपन सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेतील विजयी घोडदौड अखेर उपांत्यपूर्व फेरीत रोखली गेली. जपानच्या अकाने यामागुचीने तिला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत 43 व्या स्थानावर असणाऱ्या मालविकाला जागतिक पाचव्या मानांकित यामागुचीने 21-10, 21-16 असे केवळ 35 मिनिटांत हरविले. तिच्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. मालविकाने याआधी दोन वेळा राष्ट्रकुल पदक जिंकलेल्या 25 व्या मानांकित स्कॉटलंडच्या क्रिस्टी गिल्मूरला पराभवाचा धक्का दिला होता. यामागुचीकडून पराभूत होण्याची मालविकाची ही सलग तिसरी वेळ आहे. पहिल्या गेममध्ये यामागुचीने 12-4 अशी आठ गुणांची आघाडी घेतली व नंतर 21-10 असा गेमही जिंकला. दुसऱ्या गेममध्ये मालविकाने कडवा प्रतिकार करताना तोडीस तोड खेळ केला. दोघींची 15 गुणांवर बरोबरी झाली होती. नंतर यामागुचीने आपला दर्जा दाखवत हा गेम 21-16 असा घेत उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित केले.