मल्लापुरम जिल्हा हा वेगळा देश
केरळच्या स्थानिक नेत्याच्या व्यक्तव्याने गदारोळ
वृत्तसंस्था / थिरुवनंतपुरम
केरळमधील मल्लापुरम हा जिल्हा एक वेगळा देश असल्याप्रमाणे आहे. हा जिल्ह्यातील बव्हंशी लोकसंख्या मुस्लीम असल्याने तो प्रदेश भारतात असल्यासारखा वाटत नाही, असे वक्तव्य त्या राज्यातील एका स्थानिक नेत्याने चार दिवसांपूर्वी जाहीररित्या केल्याने तेथे मोठाच गदारोळ उडाला आहे. पुढच्या वर्षी केरळमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर हा नवा वाद निर्माण झाला असून त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात, असे मत आहे.
मल्लापुरम जिल्ह्यात कोणालाही त्याचे स्वतंत्र मत व्यक्त करता येत नाही. तेथे कोणीही बिगरमुस्लीम व्यक्ती मोकळेपणाने जगू शकत नाही. हा जिल्हा एक वेगळा देशच आहे. तेथील लोकही आपल्यापेक्षा वेगळे आहेत, असे वक्तव्य या नेत्याने मल्लापुरम येथेच आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात केले होते. या नेत्याचे नाव वेल्लापल्ली नटेशन असे आहे. या नेत्याच्या या विधानावर सध्या बरीच टीका होत असली तरी, त्याचे समर्थन करणारेही अनेकजण आहेत.
मुस्लीमबहुल जिल्हा
मल्लापुरम या केरळमधील जिल्ह्यात मुस्लिमांची संख्या 70 टक्के असून हिंदू केवळ 27.5 टक्के आहेत. हिंदूंमध्ये येथे एझवा समाजाची बहुसंख्या आहे. नटेशन यांनी आणखीही वादग्रस्त विधाने या कार्यक्रमात केली आहेत. हा कार्यक्रम चार दिवसांपूर्वी झाला होता. नटेशन यांच्या विधानावर टीका होत असूनही त्यांनी ते मागे घेण्यास किंवा क्षमायाचना करण्यास नकार दिला आहे. आपण व्यक्त केलेले विचार पूर्णत: खरे असून त्यांच्यातील एक शब्दही मागे घेतला जाणार नाही. मल्लापुरममध्ये लोकशाही नाही. तेथे तुम्हाला तेथील बहुसंख्य समाजाच्या इच्छेप्रमाणेच वागावे लागते. तेथे तुम्ही तुम्हाला घटनेने दिलेले स्वातंत्र्य किंवा सुविधा उपयोगात आणू शकत नाही, ही वस्तुस्थिती असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले.
मुस्लीम लीगची टीका
नटेशन यांच्या विधानांवर केरळमधील मुस्लीम लीगने टीका केली आहे. मल्लापुरममध्ये मुस्लिमांची बहुसंख्या असल्याने काही नेते अशी भाषा करीत आहेत. अशाप्रकारे मुस्लिमांच्या देशनिष्ठेविषयी शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मल्लापुरम हा एकाच समाजाचा जिल्हा नाही. येथे सर्व धर्मांचे आणि सर्व समाजांचे लोक पूर्वापारपासून रहात आहेत. एका समाजाला लक्ष्य बनविणे योग्य नाही, असे प्रतिपादन मुस्लीम लीगच्या नेत्यांनी केले.
मुस्लीम लीग धर्मनिरपेक्ष नाही
नटेशन यांनी मुस्लीम लीगच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. मुस्लीम लीगने आम्हाला धर्मनिरपेक्षता शिकवू नये. तो पक्ष कधीही धर्मनिरपेक्ष नव्हता. मल्लापुरम जिल्ह्यात आजवर त्या पक्षाने एकातरी बिगर मुस्लिमाला निवडणुकीत उमेदवारी दिलेली नाही. हा जिल्हा आपल्या मालकीचाच असल्यासारखा तो पक्ष वागतो. त्याने धर्मनिरपेक्षता शिकवू नये, असे प्रत्युत्तर नटेनश यांनी दिले आहे.