Solapur : माळीनगर फेस्टिवल 2 ते 6 डिसेंबर; सांस्कृतिक आणि मनोरंजन कार्यक्रमांची रंगत
माळीनगर फेस्टिवलचे दोन डिसेंबरपासून आयोजन
माळीनगर : सालाबादप्रमाणे दोन ते सहा डिसेंबर कालावधीत माळीनगर फेस्टिवल साजरा करण्यात येणार आहे. माळीनगर फेस्टिवलची तयारी पूर्ण होत आली असून मंगळवार, २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता माळीनगर फेस्टिवलचे उद्घाटन होणार आहे.
यामध्ये दि सासवड माळी शुगर फॅक्टरी, शुगरकेन सहकारी सोसायटी, मॉडेल विविधांगी प्रशाला, माळीनगर विकास मंडळ, महात्मा फुले पतसंस्था, माळीनगर मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हे फेस्टिवल होत आहे. फेस्टिवलचे मुख्य आयोजक कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संस्थांचे संचालक, कमिटी सदस्य तसेच हायस्कूलचे शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग फेस्टिवल यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
फेस्टिवलमध्ये गुलमोहर इंग्लिश स्कूल, प्राथमिक शाळा सर्व शाखा, बालविकास मंदिर, मॉडेल हायस्कूलमधील पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी, विद्यार्थिनींचे वार्षिक स्नेहसंमेलन होणार आहे. ज्यातून विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यात येणार आहे.
स्नेहसंमेलन फेस्टिवलच्या ठिकाणी रोज सायंकाळी सहा ते दहा या वेळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. फेस्टिवलमध्ये १०० व्यापारी स्टॉल उभारले आहेत. महिलांसाठी खास ज्वेलरीचे स्टॉल्स, कृषिविषयक माहिती देणारे स्टॉल, खवय्यांसाठी व्हेज, नॉनव्हेजचे स्टॉल अशी जय्यत तयारी झाली असून लहानांपासून मोठ्यांपर्यंत आनंद घेण्यासाठी आकाश पाळणा, टोराटोरा, क्रॉस व्हील, ड्रॅगन, मौत का कुवा लहान मुलांसाठी मिकी माऊस, वॉटर बोट, जंपिंग, चक्री, हेलीकॉप्टर, मिनी ट्रेन आदी खेळ खेळणी उभारण्याची तयारी चालू असल्याची माहिती माळीनगर फेस्टिवलचे मुख्य आयोजक राजेंद्र गिरमे यांनी दिली.
पोलीस सुरक्षा, होमगार्ड, कारखान्याचे वॉचमन बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. दरवर्षी माळीनगर फेस्टिवलला माळशिरस तालुक्यातील परिसरातील व पूर्व भागातील नागरिक भेट देत असतात.