विरोधानंतरही माळी गल्ली शाळेचे स्थलांतर
तात्पुरत्या स्वरुपात पावसामुळे शाळा हलविण्यात आल्याचे कारण
बेळगाव : नागरिकांनी विरोध केल्यानंतरही शाळा धोकादायक असल्याचे कारण देत माळी गल्ली येथील शाळा क्रमांक 4 फुलबाग गल्ली येथील शाळेत हलवण्यात आली. मागील चार दिवसांपासून फुलबाग गल्ली येथे या शाळेचे वर्ग भरवले जात आहेत. परंतु, पावसाळा संपल्यानंतर पुन्हा माळी गल्ली येथेच शाळा भरविण्याची मागणी माजी विद्यार्थ्यांनी केली आहे. पटसंख्या कमी झाल्याचे कारण देत शहरातील अनेक मराठी शाळा सरकारकडून बंद केल्या जात आहेत. काही शाळा जवळच्या शाळांमध्ये स्थलांतरित करून त्या कायमच्या बंद केल्याचे अनेक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. माळी गल्ली येथील शाळा क्र. 4 येथील इमारत जीर्ण झाल्याने ती फुलबाग गल्ली येथे हलविणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. परंतु, याला माजी विद्यार्थी व परिसरातील नागरिकांनी कडाडून विरोध केला. त्यामुळे यावर्षीचे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतरही माळी गल्ली येथेच शाळा भरविली.
फुलबाग गल्लीत तात्पुरती हलविली
मागील काही दिवसात बेळगाव परिसरात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शाळेच्या इमारतीला धोका निर्माण झाला असल्याचे कारण देत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाकडून स्थलांतरणाची सूचना करण्यात आली. त्यामुळे माळी गल्ली येथील शाळा तात्पुरत्या स्वरुपात फुलबाग गल्ली येथे हलवण्यात आली आहे. परंतु, यामुळे विद्यार्थ्यांना फोर्ट रोड येथील मुख्य रस्ता ओलांडून ये-जा करावी लागत असल्याने पालकवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद पडणार नाही
माळी गल्ली येथील शाळेला मोठा इतिहास असून येथून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज मोठ्या हुद्द्यांवर आहेत. कोणत्याही परिस्थितीत शाळा बंद पडणार नाही, यासाठी माजी विद्यार्थ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या तात्पुरत्या स्वरुपात शाळा फुलबाग गल्ली येथे हलविण्यात आली असली तरी पावसाळ्यानंतर पुन्हा माळी गल्ली येथेच शाळा सुरू ठेवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे प्रयत्न असतील.
-मेघन लंगरकांडे