व्हॅक्सिन डेपोमधील ग्लास हाऊसमध्ये गैरप्रकार
मद्यपी-अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचा बनला अड्डा : काचा फोडून टाकल्याने अवकळा, सुरक्षारक्षक नियुक्तीसह गस्त घालण्याची मागणी
बेळगाव : कोट्यावधी रुपये खर्च करून टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोमध्ये उभारण्यात आलेल्या ग्लास हाऊसची दूरवस्था झाली आहे. ग्लास हाऊसच्या चोहोबाजूंनी बसविण्यात आलेल्या ग्लासची तोडफोड करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर हे ग्लास हाऊस म्हणजे जणू अवैध धंद्यांसाठी अड्डाच बनला आहे. मद्यपी तसेच जुगारी आणि प्रेमीयुगुलांचा वावर या ठिकाणी वाढला असल्याने परिसरातील रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करण्याची वेळ आली आहे. स्मार्ट सिटी योजनेतून व्हॅक्सिन डेपोमध्ये विविध विकासकामे राबविण्यासह ग्लास हाऊसदेखील उभारण्यात आले आहे. मात्र, यासाठी जिल्हा आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे व्हॅक्सिन डेपोतील जैवविविधता धोक्यात आल्याने पर्यावरणप्रेमीतून विकासकामाच्या नावाखाली झाडांची होणारी कत्तल रोखण्यात यावी, यासाठी आवाज उठविण्यात आला होता. त्यामुळे तत्कालीन जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती.