For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मालेवारचे नाबाद शतक, विदर्भाची दणक्यात सुरुवात

06:52 AM Feb 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
मालेवारचे नाबाद शतक   विदर्भाची दणक्यात सुरुवात
Advertisement

पहिल्याच दिवशी 4 बाद 254 धावा, करुण नायरची 86 धावांची खेळी

Advertisement

विदर्भ क्रिकेट असोशिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या रणजी ट्रॉफीच्या फायनल सामन्यात केरळविरुद्ध लढतीत यजमान विदर्भाने दणक्यात सुरुवात करताना पहिल्या दिवशी 4 बाद 254 धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा युवा फलंदाज दानिश मालेवार 138 तर यश ठाकूर 5 धावांवर खेळत होते. स्टार फलंदाज करुण नायरने 86 धावांची संयमी खेळी साकारली.

केरळने अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. उजव्या हाताच्या फलंदाज असलेल्या दानिशने सुरूवातीच्या षटकांपासून चांगली सुरूवात केली. हिरव्यागार खेळपट्टीमुळे सुरुवातीलाच 3 धक्के मिळाले. या खेळपट्टीने पहिल्या सत्रात वेगवान गोलंदाजांना मदत केली. सलामीवीर पार्थ रेखाडेला भोपळाही फोडता आला नाही. ध्रुव शोरे 16 तर दर्शन नळकांडे 1 धावा काढून बाद झाला. यावेळी विदर्भाची 3 बाद 24 अशी स्थिती झाली होती.

Advertisement

दानिश मालेवारचे नाबाद शतक

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मालेवार आणि पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या करुण नायरने 215 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. करुण नायरबरोबरची ही भागीदारी पुढे नेत मालेवारने चालू मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याचा विदर्भासाठी हा पहिलाच हंगाम आहे. डावखुरा फिरकीपटू आदित्य सरवटेच्या चेंडूवर षटकार ठोकून 99 धावा केल्यानंतर मालेवारने मिड-विकेटवर चौकार ठोकून शतक पूर्ण केले. दानिशने शानदार शतकी खेळी साकारताना 259 चेंडूत 14 चौकार व 2 षटकारासह नाबाद 138 धावांची खेळी साकारली. अनुभवी करुण नायरनेही त्याला चांगली साथ देताना 188 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 86 धावांचे योगदान दिले. पण, शतकाच्या उंबरठ्यावर असताना तो धावबाद झाला.

नायर बाद झाल्यानंतर मालेवार व यश ठाकूर यांनी दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. या दोघांनी एकेरी दुहेरी धावांवर भर देत संघाचे द्विशतक फलकावर लावले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विदर्भाने 86 षटकांत 4 गडी गमावत 254 धावापर्यंत मजल मारली होती. दानिश मालेवार 138 तर यश ठाकूर 5 धावांवर खेळत होते. प्रथमच अंतिम फेरी खेळणाऱ्या केरळच्या गोलंदाजांना अंतिम सामन्यात वेशेष छाप पाडता आली नाही. केरळकडून निदीशने 2 तर एडन टॉमने 1 गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ पहिला डाव 86 षटकांत 4 बाद 254 (पार्थ रेखाडे 0, ध्रुव शोरे 16, दर्शन नळकांडे 1, दानिश मालेवार खेळत आहे 138, करुण नायर 86, यश ठाकूर खेळत आहे 5, निधीश दोन बळी).

Advertisement
Tags :

.