मळेकरणी देवी परिसरात अधिकाऱ्यांकडून पाहणी करावी
उचगाव ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील मळेकरणी देवीच्या परिसरात पशुबळी देण्याच्या प्रथेला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन प्रतिबंध केला व मोठ्या परिवर्तनाकडे वाटचाल केली. यापुढे मंदिराच्या आवारामध्ये कोणत्याही प्रकारची मांसविक्री होणार नाही. तसेच अपेयपान होणार नाही, याची दक्षता पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने घ्यावी, अशा आशयाचे निवेदन विश्वप्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांच्या पुढाकाराने उचगाव ग्रामस्थांनी दिले.
गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांना हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, यापूर्वी मंगळवार आणि शुक्रवारी मळेकरणी देवीच्या मंदिर परिसरात पशुबळी देण्याची प्रथा होती. अलीकडच्या काळात हे प्रमाण वाढत चालले. याशिवाय मांसाहाराबरोबरच अपेयपान वाढले. त्यासाठी शेतकऱ्यांच्या शेताचा वापर होऊ लागला. वाहतूक कोंडी होऊ लागली. या सर्वांचा त्रास ग्रामस्थांना होऊ लागला. त्यामुळे ग्राम पंचायतीच्या पुढाकाराने ग्रामस्थांनी एकत्र येऊन पशुबळी देण्याच्या प्रथेला प्रतिबंध केला.
कर्नाटक पशुबळी प्रतिबंध कायदा-1959 व 1975 अन्वये कोणत्याही परिस्थितीत पशुबळी देण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने निर्बंध घातले आहेत. त्याचे पालन उचगावमध्ये होत आहे. मात्र, यापुढेही या निर्णयाचे उल्लंघन होणार नाही, याचीही काळजी जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी घ्यावी व मंगळवारी आणि शुक्रवारी या परिसरात अधिकाऱ्यांना पाठवून पाहणी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. उचगाव ग्रा. पं. च्या अध्यक्षा मथुरा तेरसे व अन्य सदस्यांनी हे निवेदन स्वामींच्या पुढाकाराने दिले. जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन मंदिर परिसरात तसेच अन्यत्र कोठेही पशुबळी दिला जाणार नाही, याची पूर्ण काळजी घेऊ, असे आश्वासन दिले.