कोलंबो संमेलनात भारताच्या बाजूने मालदीव
चीनला दिला स्पष्ट संदेश : बांगलादेशने मात्र राखले अंतर
वृत्तसंस्था/ कोलंबो
हिंदी महासागरात वाढत्या आव्हानांना सामना करण्यासाठी मालदीव देखील आता भारतासोबत उभा असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. कोलंबो सुरक्षा संमेलन (सीएससी) सचिवालयाच्या स्थापनेसाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, मालदीव, मॉरिशस आणि श्रीलंकेच्या प्रतिनिधींनी करारावर स्वाक्षरी केली आहे. हिंदी महासागरातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी या सर्व देशांनी करारावर स्वाक्षरी केली. मालदीवने हिंदी महासागर क्षेत्रात सहकार्यासाठी भारतासोबत उभे राहून चीनला स्पष्ट संदेश दिला. परंतु बांगलादेश या करारात सामील झालेला नाही. बांगलादेशात राजकीय उलथापालथीनंतर अंतरिम सरकार स्थापन झाले आहे.
कोलंबो सुरक्षा संमेलनात भारत, श्रीलंका, मालदीव आणि मॉरिशसचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सामील झाले. बांगलादेशला सीएससीत पाचवा देश म्हणून सामील करण्यात आले आहे. कोलंबो सुरक्षा संमेलनात सागरी सुरक्षा, दहशतवाद आणि कट्टरवादाच्या विरोधात कारवाई, तस्करी आणि गुन्हे रोखणे, सायबर सुरक्षा तसेच मानवी मदतीवरून करार करण्यात आले. सीएससी चार्टरवर श्रीलंकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सगाला रत्नायक, मालदीवचे एनएसए इब्राहिम लतीफ, मॉरिशसचे श्रीलंकेतील उच्चायुक्त हामैंडोयाल डिलिम आणि भारताचे एनएसए अजित डोवाल यांनी स्वाक्षरी केली. तर बांगलादेशचा कुठलाही प्रतिनिधी उपस्थित नव्हता.
सीएससीमधील करारानुसार सर्व सदस्य देश मिळून अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्र तस्करी आणि मानव तस्करी रोखण्यास मदत करणार आहेत. याचबरोबर परस्परांना माहिती पुरवून दहशतवाद आणि हिंसा रोखण्याचा प्रयत्न करतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार सायबर सुरक्षेवर लक्ष दिले जाणार आहे. याचबरोबर सीएससीत क्षमतानिर्मिती, संयुक्त अभ्यास आणि कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबविण्यासंबंधीही करार करण्यात आला आहे. सागरी प्रदूषण, सागरी सुरक्षा आणि अन्य प्रकरणांवरही परस्पर सहकार्यावरून सर्व देशांनी करारावर स्वाक्षरी केली आहे.
मुइज्जू यांच्या भूमिकेत बदल?
कोलंबो सुरक्षा संमेलनाचा उद्देश सहकारी देशांचे सुरक्षा सल्लागार आणि उपसुरक्षा सल्लागारांदरम्यान संवाद निर्माण करणे आहे. सीएससी सचिवालय कोलंबोतच असेल आणि तेथे एक महासचिव नियुक्त केला जाणार आहे. सीएससीत सामील होत मोहम्मद मुइज्जू यांनी हिंदी महासागर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी मालदीव भारतापेक्षा अधिक विश्वास अन्य कुठल्याही देशावर ठेवत नसल्याचे संकेत दिले आहेत. हिंदी महासागरात चीनचा वाढता वावर आता भारतासाठी चिंतेचा विषय ठरला आहे. अशा स्थितीत सीएससी सागरी सुरक्षेसाठी आता चीनसाठी चिंतेचा विषय ठरू शकतो.