मालदीवचा चीनसोबत गुप्त सैन्य करार
भारतीय सैनिकांना देशाबाहेर काढण्याचा प्रकार
वृत्तसंस्था/ माले
मालदीव आणि भारत यांच्यातील संबंधांमध्ये तणाव वाढत आहे. भारताच्या 85 सैनिकांना देशाबाहेर जाण्यास सांगितल्यावर मालदीवच्या सरकारने आता चीनसोबत दोन गुप्त सैन्य करार केले आहेत. या करारांना चीन आणि मालदीवदरम्यान द्विपक्षीय संरक्षण संबंधांमधील नव्या अध्यायाची सुरुवात मानण्यात येत आहे. या करारांवर मालदीवचे संरक्षणमंत्री घसान मौमून आणि चिनी सैन्याचे मेजर जनरल झांग बाओकून यांनी स्वाक्षरी केली आहे. या करारांचा तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे.
यापूर्वी मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी एक टेहळणी व्यवस्था निर्माण करण्याची घोषणा केली होती. लक्षद्वीप वाद आणि चीन दौऱ्यानंतर मालदीवचे अध्यक्ष मुइज्जू हे सातत्याने भारताच्या विरोधात वक्तव्यं करत आहेत. भारताच्या चिंता वाढविणारी पावलं त्यांच्याकडून उचलली जात आहेत.
चीन मालदीवमध्ये शक्तिशाली रडार बसवू शकतो असे मानले जाते. अशा स्थितीत चीनकडून भारताच्या प्रत्येक युद्धनौकेच्या हालचाली टिपल्या जाऊ शकतात. चीन मालदीवला मोफत सैन्य सहाय्य पुरवू शकतो अशी तरतूद एका करारात असल्याचा दावा मालदीवच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. तर दुसरीकडे चीनच्या हेतूबद्दल मालदीवमध्ये देखील संशय व्यक्त होत आहे. मालदीवमध्ये सत्तारुढ असलेला मुइज्जू यांचा पक्ष हा चीनधार्जिणा मानला जातो.
मालदीववर चीनच्या कर्जाचा मोठा भार आहे. मुइज्जू हे अध्यक्ष झाल्यापासून मालदीव आणि भारताचे संबंध बिघडले आहेत. मुइज्जू यांनी भारतीय सैनिकांनी 10 मेपर्यंत मालदीवमधून बाहेर पडावेत असे म्हटले आहे. तर दुसरीकडे मालदीवच्या अध्यक्षांनी तुर्कियेसोबत बायरकतार ड्रोन खरेदी करार केला आहे. मालदीवचा रागरंग पाहून भारताने आयएनएस जटायू हा नौदलाचा तळ मिनिकोय बेटावर स्थापन केला आहे. हा तळ मालदीवपासून काही अंतरावरच आहे.