पाकिस्तानातील राजदूतावर मालदीवची कारवाई
विनाअनुमती तालिबानी मुत्सद्द्याची घेतली होती भेट
वृत्तसंस्था/ माले
मालदीवने पाकिस्तानातील स्वत:चा राजदूत मोहम्मद तोहा यांना परत बोलाविण्याचा निर्णय घेतला आहे. तोहा यांनी 1 नोव्हेंबर रोजी इस्लामाबादमध्ये तालिबानचे मुत्सद्दी सरदार अहमद शाकिबची भेट घेतली होती. यादरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांदरम्यान अफगाणिस्तान-मालदीवच्या संबंधांवर चर्चा झाली होती.
स्वत:च्या राजदूताला या बैठकीची अनुमती दिली नव्हती. याचमुळे त्याला परत बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मालदीवच्या विदेश मंत्रालयाने सांगितले आहे. इस्लामाबाद येथील मालदीवच्या दूतावासाच्या वेबसाइटवरूनही आता तोहा यांचे नाव हटविण्यात आले आहे. तोहा यांना जुलै महिन्यात पाकिस्तानातील राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले होते. मालदीवच्या सरकारने आता त्यांच्या विरोधात कारवाई केली आहे.
तालिबानकडून प्रयत्न
तालिबान 2021 मध्ये अफगाणिस्तानातील सत्तेवर परतला होता. तेव्हापासून आतापर्यंत कुठल्याही देशाने तालिबानच्या राजवटीला मान्यता दिलेली नाही. परंतु 3 वर्षांपासून तालिबानने अनेक देशांसोबत कूटनीतिक संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. पाकिस्तान, चीन, रशिया आणि इराण यासारख्या अनेक देशांनी अफगाणिस्तानशी राजनयिक संबंधांची सुरुवात केली आहे. परंतु काबुलमधील सर्व पाश्चिमात्य देशांच्या दूतावासाला अद्याप टाळले आहे. दक्षिण अशियातील सर्वात छोटा इस्लामिक देश असलेल्या मालदीवने देखील अद्याप तालिबानी राजवटीला मान्यता दिलेली नाही.
भारताशी संबंध मजबूत करण्याची इच्छा
मार्च महिन्यात तालिबानचे विदेशमंत्री आमिर खान मुत्ताकी यांनी भारताच्या एका शिष्टमंडळाची भेट घेतली होती. आम्ही भारतासोबत राजनयिक आणि आर्थिक स्तरावर संबंध मजबूत करू इच्छितो असे मुत्ताकी यांनी म्हटले होते. तर यादरम्यान विदेश मंत्र्याने भारताला अफगाण व्यापारी, विद्यार्थी आणि रुग्णांसाठी व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याचे आवाहन केले होते.