परिख पुलाखाली तातडीने विद्युत व्यवस्था करा
कोल्हापूर :
परिख पुल येथे विद्युत व्यवस्था नसल्यामुळे रात्रीच्यावेळी पायी जाणाऱ्यांची गैरसोय होते. तसेच येथे चोरीचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून परिख पुलाखाली तातडीने विद्युत व्यवस्था करावी, अशा सूचना प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी महापालिका अधिकाऱ्यांना केली. दरम्यान पादचारी उड्डाण पुलाच्या उभारणीसाठी रेल्वे विभागाने मागणी केल्यानुसार, 52 लाख रूपये लवकरच भरले जातील, अशी माहिती प्रशासकांनी दिली.
कोल्हापुरातील शाहुपूरी आणि राजारामपुरीला जोडणाऱ्या परिख पुलाखालून सध्या धोकादायक वाहतूक सुरू आहे. मुळात हा पुल अत्यंत जुना झाला आहे. परंतू रेल्वे फाटकावर दोन्ही बाजूला संरक्षक भिंत उभारल्याने.
परिख पुलाखालूनच नागरिकांना जीव मुठीत घेवून ये-जा करावी लागते. पुलाखाली लाईट नसल्यामुळे रात्रीच्यावेळी येथून जाणे धोक्याचे ठरत आहे. याची माहिती महापालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांना मिळाली. त्यांनी शुक्रवारी शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, आर.के.पाटील, सुरेश पाटील यांच्यासोबत परिख पुल परिसराची पाहणी केली. यावेळी त्या बोलत होत्या.
परिख पुलाखाली महापालिकेने लावलेले दिवे अज्ञातांनी फोडले आहेत. त्याठिकाणी प्रखर प्रकाश देणारे दिवे तातडीने बसवावेत, अशा सुचना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी केली. दरम्यान रेल्वे फाटकाजवळ पादचारी उड्डाण पुल उभारण्यासाठी रेल्वे विभागाने महापालिकेकडे 52 लाख रूपयांची मागणी केली. हे पैसे लवकरच वर्ग केले जातील, असे प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.
परिख पूल संदर्भातील सुनावणी 7 फेब्रुवारीला
परिख पूलला पर्याय देण्यासांदर्भात न्यायालयात दावा दाखल केला आहे. यासंदर्भात आज सुनावणी होती. यावेळी मनपा, प्रशासनाने म्हणणे सादर करण्यासाठी अवधी मागून घेतला असून पुढील सुनावणी 7 फेब्रुवारी रोजी आहे.