For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शाहूनगर-कंग्राळी बुद्रुक रस्ता 40 फूटच करा

12:45 PM Nov 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
शाहूनगर कंग्राळी बुद्रुक रस्ता 40 फूटच करा
Advertisement

रस्त्यामध्ये जमीन गेलेले शेतकरी वर्ग आपल्या भूमिकेवर ठाम : 60 फूट मार्किंग शेतकऱ्यांनी बंद पाडले : पीडीओंना निवेदन

Advertisement

वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक 

कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने काँक्रीट गटारी व डांबरीकरण करणे या 40 फूट रूंद रस्त्याचा तिढा कायम असून सोमवारी परत शेतकरी वर्गाने आक्रमक होऊन 40 फूटच रूंद रस्ता करावा व 40 फूट रस्ता रूंद करण्यास आमची संमती असल्याचे निवेदन ग्रा.पं. पीडीओ गोविंद रंगाप्पगोळ यांना शेकडो शेतकऱ्यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. तसेच मुख्य रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने 20-20 फूट शेतकऱ्यांची जमीन घेऊन प्रथम गावापासून शेतकऱ्यांना कळवून काम सुरू करण्याचेही सांगण्यात आले.

Advertisement

निवेदनाचा स्वीकार करून आम्ही तलावाकडूनच रस्ता खोदाईचे काम सुरू करू. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान करणार नाही, असेही उपस्थित शेतकरी वर्गाला सांगितले. कंग्राळी बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवीची यात्रा 28 एप्रिल 2026 रोजी होणार आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून शाहूनगर ते कंग्राळी गावापर्यंतच्या मुख्य रस्त्यासाठी व गावातील इतर नागरी समस्यांसाठी एकूण 10 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. मागील सोमवारी सदर रस्त्यांच्या कामाचाही शुभारंभ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. शुक्रवारी रस्त्याच्या मध्यापासून ग्रा. पं. च्या वतीने रस्त्याचे मार्कींग सुरू असताना 60 फूट मार्कींग होत असल्याचे शेतकऱ्यांच्या निदर्शनास येताच शेतकऱ्यांनी आक्रमक होऊन शाहूनगर ते गावापर्यंत 40 फूट करावा, अशी मागणी करत काम बंद पाडले होते.

रस्त्यासाठी विनामोबदला जमीन 

शाहूनगर ते कंग्राळी बुद्रुक गावापर्यंत पूर्वी 40 ते 50 वर्षांपूर्वी एक पायवाट होती. त्यावेळी गावातील सुजान व्यक्तीनी पायवाटेच्या दोन्ही बाजूने जागा घेऊन कच्चा रस्ता तयार केला. तसेच मागील 20 ते 25 वर्षांपासून बेळगाव शहराचे सांडपाणी शाहूनगरमार्गे रस्त्याच्या दोन्ही बाजूने शेतकऱ्यांनी आपल्या जागेतूनच तयार केलेल्या कच्च्या गटारीतून सोडल्याने वाहून मार्कंडेय नदीला जात आहे. ही जागाही शेतकरी वर्गाचीच आहे. तेच आता पुनहा श्री लक्ष्मीदेवी यात्रा पार्श्वभूमीवर रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूने 20 फूट जमीन घेऊन रस्ता होणार आहे. यामध्ये परत शेतकरी वर्गाची सुपीक पिकाऊ जमीन जाणार आहे. परंतु गावच्या विकासासाठी शेतकरी विनामोबदला सहज हस्ते आपली शेतजमीन देऊन  विकास कामाला हातभार लावत असल्याचे ‘तरुण भारत’शी बोलताना उपस्थित शेतकरी वर्गाने सांगितले. निवेदन देतेवेळी सुभाष हुद्दार, नाथाजी पाटील, हभप भरमा पाटील, विश्वनाथ पाटील, आनंद पाटील, महादेव पाटील, वाय. बी. चव्हाण, गोपाळ पाटील, शंकर पाटील, किरण पाटील, उमेश हुद्दार, गुंडू हुद्दार, विजय हुद्दार, परशराम पाटीलसह शेकडो शेतकरी बांधव उपस्थित होते.

रस्त्याच्या मध्यापासून 20-20 फूट शेतजमीन घेण्याची मागणी

ग्रा. पं. कार्यालयामध्ये रस्ता मध्यापासून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांची 20-20 फूट शेतजमीन घेऊन रस्त्याचे डांबरीकरण करण्यासंदर्भात पीडीओ गोविंद रंगाप्पगोळ यांना निवेदन देतेवेळी ग्रा. पं. सदस्य व रस्त्यामध्ये शेतजमीन जाणारे शेतकरी यांच्यात थोडी बाचाबाची झाली. परंतु शेतकरी वर्गाने दोन्ही बाजूची जागा घेऊन 40 फूट रस्ता करण्यास आम्ही सहमत असल्याचे सांगितले. तसेच बेळगाव शहरापासून कंग्राळी बुद्रुक गाव शेवटचे असल्यामुळे सदर गावाला 60 फूट रस्ता करून शेतकरीवर्गाचे नुकसान करू नका. सदर गावाला 40 फूट रस्ता पुरेसा असल्यामुळे 40 फूट रस्ता करण्यास आमची कोणतीच हरकत नसल्याचे उपस्थित शेतकरी वर्गाने सांगितले.

Advertisement
Tags :

.