अधिवेशन काळात निवास, वाहतूक,भोजनाची व्यवस्था चोखपणे करा
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची पूर्वतयारी बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : यंदाचे विधिमंडळ हिवाळी अधिवेशन 9 डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने येणारे मंत्री, अधिकारी व कर्मचाऱ्यांची निवास, वाहतूक, भोजन आदींची व्यवस्था चोखपणे करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केली. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार दि. 20 रोजी पूर्वतयारी बैठक झाली. बैठकीमध्ये जिल्हाधिकारी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. अधिवेशन यशस्वी करण्यासाठी विविध समित्या नेमण्यात आल्या आहेत. निवास, आहार, वाहतूक, आरोग्य, तक्रार निवारण अशा समित्या कार्यरत राहणार असून या समित्यांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी.
व्यवस्थेत कोणतीही कमतरता भासणार नाही, याकडे लक्ष द्यावे. अधिवेशनासाठी येणाऱ्या सुरक्षा कर्मचारी, वाहनचालक यांच्याही व्यवस्थेची काळजी घ्यावी. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्र्यांच्या शिष्टाचारामध्ये कोणतीही कमतरता भासणार नाही, याची दखल घ्यावी. शहरातील हॉटेलमधून वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्यवस्था करण्यात येणार असून हॉटेलना भेट देऊन हॉटेलमालकांना खोल्या आरक्षित ठेवण्याची सूचना करावी. अधिवेशन काळात सुवर्णसौधमध्ये इंटरनेट व्यवस्था निरंतरपणे चालू रहावी, याचीही दक्षता घ्यावी.
वैद्यकीय पथकाचे नियोजन
लोकप्रतिनिधी व इतर अधिकारी, मान्यवर,माध्यम प्रतिनिधी यासह अधिवेशनासाठी येणाऱ्या सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेऊन प्रसंगी तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्यावी. अधिवेशनासाठी येणारे जेथे वास्तव्य करून राहतील, त्या ठिकाणी व सुवर्णसौध आवारात वैद्यकीय पथक आणि रुग्णवाहिकेची व्यवस्था करावी. एकंदरीत यंदाचे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी सर्व खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे, अशी सूचनाही त्यांनी केली. अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, विशेष जिल्हाधिकारी हर्ष शेट्टी, महापालिका आयुक्त शुभा बी., जिल्हा पंचायतीचे मुख्य योजना संचालक गंगाधर दिवटर, ‘काडा’चे प्रशासक सतीशकुमार, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता सोबरद, जिल्हा नगरविकास कोष योजना संचालक मल्लिकार्जुन कलादगी, आहार खात्याचे उपसंचालक मल्लिकार्जुन नाईक, जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, कन्नड-सांस्कृतिक खात्याच्या उपसंचालिका विद्यावती बजंत्री यासह अन्य खात्याचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.