साहित्याशी मैत्री करा, आयुष्य उजळवा
संमेलनाध्यक्षा प्रा. मृणाल पर्वतकर यांचे मत : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे 25 वे मराठी बालसाहित्य संमेलन उत्साहात
प्रतिनिधी/ बेळगाव
मराठी साहित्य हे अत्यंत समृद्ध आहे. समाजाला आपल्या सोबत घेऊन जाते ते साहित्य. साहित्याशी मैत्री करून घेतल्याने आपले आयुष्य उजळते. साहित्यिक आपल्या कलेच्या माध्यमातून मोठे होतात. प्रत्येकामध्ये एक राजहंस दडलेला असतो, तो ओळखता यायला हवा. तुम्ही साहित्याशी मैत्री करा आणि आपल्या मायमराठीला मोठे करून तिचे पांग फेडण्याचा संकल्प करा, असे विचार प्रा. मृणाल पर्वतकर यांनी व्यक्त केले.
गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी आयोजित शनिवारी 25 वे मराठी बालसाहित्य संमेलन गोगटे रंगमंदिर येथे पार पडले. त्यावेळी अध्यक्ष या नात्याने त्या बोलत होत्या. व्यासपीठावर दीपक पर्वतकर, वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर, विद्यार्थी प्रतिनिधी शिवराज गवळी, प्राची सांबरेकर उपस्थित होते. प्रारंभी शाळेपासून सभागृहापर्यंत विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडी काढली. रोपट्यास पाणी घालून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.
प्रा. मृणाल म्हणाल्या, मुले कथांचे वाचन करतात पण कवितांकडे कमी लक्ष देतात. कवितांची गोडी लागण्यासाठी कवितांचे वाचन करणे आवश्यक आहे. कठीण परिस्थितीवर मात करून अनेक साहित्यरत्न उदयास आले असून त्यांनीच साहित्याला भरारी दिली आहे. मुलांनी वाचनाची गोडी लावून घेतल्यास आपले भविष्य उज्ज्वल बनते. मराठी भाषेत अजरामर अशी बालगीते आहेत, त्या कवितांची उजळणी करा आणि उत्तमोत्तम साहित्य वाचत रहा.
साहित्याची खरी ओळख आई व आजीकडून मिळते. त्या लहानपणापासूनच मुलांना कथा व अंगाईच्या माध्यमातून साहित्याचा परिचय करून देतात. त्यामुळे त्यासुद्धा एकप्रकारे साहित्यिका आहेत. मुलांनी आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षकांचे मार्गदर्शन घ्यावे. साठे प्रबोधिनी मराठीला पुढील पिढीकडे सोपविण्यासाठी कार्य करत आहे. मुलांसाठी, भाषेसाठी मराठी प्रबोधिनीचे कार्य कौतुकास्पद आहे. अशाप्रकारे प्रबोधिनीकडून साहित्याचा जागर होत राहो, असे सांगत त्यांनी ‘माय गं माय’ या कवितेतून शाळेचे महत्त्व विषद केले.
यावेळी दीपक पर्वतकर म्हणाले, वाचनाचे प्रतिबिंब भविष्यात प्रतिबिंबित होते. लहान वयापासूनच वाचन आत्मसात केल्यास व्यक्तिमत्त्व सुधारते. बालसाहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आई हीच बालसाहित्याची जननी असून साहित्यामुळेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज लाभले. बालसाहित्य हे जगभरात पोहोचले असून बालसाहित्याचे वाचन अनिवार्य आहे. प्रत्येकाने याचे वाचन करणे आवश्यक आहे. बेळगावशी आपले नाते खूप जुने असून बेळगावशी आपली जवळीक आहे, असे त्यांनी सांगितले.
स्वातंत्र्याचा लढा देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या आईकडून कथेच्या माध्यमातून लढण्याची प्रेरणा मिळाली. यामुळे साहित्य हे सर्वश्रेष्ठ आहे. वाचाल तर वाचाल या म्हणीप्रमाणे प्रत्येकाने वाचन आत्मसात करणे अत्यावश्यक आहे. वाचनामुळे संकटांचा सामना करण्यास बळ मिळते. बालसाहित्यिकांनी साहित्यामध्ये नवक्रांती घडवून आणावी, असे सांगत पर्वतकर यांनी गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीला 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
यानंतर कथाकथन कार्यक्रम पार पडला. आराध्या शिवणगेकर हिने ‘मुक्ताई कथा’, सई यादव हिने ‘दिसतं ते सोनं नव्हे’, अथर्व गुरव याने ‘स्वामीनिष्ठ शिवा’, श्रद्धा पाटील हिने ‘मुर्खांचा बाजार’, समृद्धी सांबरेकर हिने ‘जावयाची वरात’ तर मनाली मराठे हिने ‘मन्या’ ही कथा सादर केली. याचे सूत्रसंचालन बी. बी. शिंदे यांनी केले. यानंतर कवि संमेलनात राधिका पाटील, भाग्यश्री लाळगे, वैजनाथ पाटील, स्नेहा हिरोजी, सारिका पाटील, भाग्यश्री मोतेकर, हर्षदा भातकांडे, शाहीर स्फूर्ती चांदवडेकर यांनी कविता सादर केल्या. याचे सूत्रसंचालन हर्षदा सुंठणकर यांनी केले.
कवि संमेलनानंतर मास्टर अजिंक्य शेकदर स्मृती फाऊंडेशनच्यावतीने पुण्याच्या मुलांच्या पथकाकडून ‘मधली सुट्टी’ हे नाटक सादर करण्यात आले. संमेलनात सहभाग घेतलेल्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याचे सूत्रसंचालन प्रसाद सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल पोटे यांनी केले. सायली भासले यांनी आभार मानले.