घरच्या घरी बनवा खुशखुशीत आणि हेल्दी बिस्किट
बिस्किट हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. आणि चहासोबत बिस्कीट खाण्याची मजाच काय वेगळी असते. पण बाजारात अनेकदा मैद्यापासून बनवले जाणारे बिस्किट उपलब्ध असतात. मैदा शरीरासाठी हानिकारक असल्याने मैद्याची बिस्किट खाणे शरीरासाठी चांगले नाही. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी गव्हाच्या पिठापासून बनवले जाणारे बदाम-पिस्ता बिस्किटची रेसिपी जाणून घेणार आहोत.
साहित्य
२ कप गव्हाचे पीठ
२/४ कप रवा
अर्धी वाटी दूध
१ कप गूळ
७-१० चमचे तूप
२ चमचे वेलची पावडर
चिरलेले बदाम आणि पिस्ता
२ चमचे बेकिंग पावडर
कृती
बदाम-पिस्ता बिस्किट बनवण्यासाठी सर्वप्रथम एका पॅनमध्ये गूळ, तूप आणि दूध उकळून घ्या. गूळ वितळल्यानंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ, रवा घ्या. नंतर त्यात वेलची पूड, बारीक चिरलेले बदाम आणि पिस्ता, बेकिंग पावडर टाका. मग त्यात गुळाचे मिश्रण घालून सर्व नीट एकजीव करा.आणि पीठ मळून घ्या. आता हाताला तूप लावून या मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि नंतर त्यांना गोल आकार द्या, ते सपाट करा आणि नंतर हलक्या हातांनी तुम्हाला हवा तसा कोणताही आकार द्या.यावर तुम्ही आवडीनुसार बदाम पिस्त्याचे कापही ठेवू शकता. नंतर एका ट्रेवर बटर पेपरठेवून त्यावर सर्व बिस्किटे ठेवा. आता एका कढई मध्ये वाळू टाकून त्यावर स्टॅन्ड ठेवून प्री हीटिंग साठी गॅसवर ठेवा. पाच मिनिटांनी त्या स्टँडवर बिस्कीट चे ताट ठेवा आणि २५ मिनिटे बेक करा. आता तुमचे खुसखुशीत बिस्किट तयार आहेत. हे बिस्किटे थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावे.