‘अॅक्सेंच्युअर’ कडून मोठी कर्मचारीकपात
वृत्तसंस्था / डब्लिन
आयर्लंडची राजधानी डब्लिन येथे स्थित असणाऱ्या ‘अॅक्सेंच्युअर’ या माहिती तंत्रज्ञान कंपनीने गेल्या काही आठवड्यांमध्ये कोणताही गाजावाजा न करता, 11 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. ही कंपनी कन्सल्टन्सी क्षेत्रात अग्रेसर असून जगातील विख्यात कंपन्यांमध्ये तिचा समावेश केला जातो. या कंपनीने मोठ्या प्रमाणात केलेल्या या कपातीमुळे संगणक क्षेत्रातील रोजगारांसंबंधीची स्थिती स्पष्ट होते, असे मत अनेक तज्ञांनी व्यक्त केले आहे.
काही आठवड्यांपूर्वी या कंपनीने 7 हजार 669 कोटी रुपयांची कर्मचारी कपात योजना लागू केली आहे. या योजनेला पुनर्रचना कार्यक्रम असे नाव देण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी एकतर नवी कौशल्ये आत्मसात करावीत, किंवा त्यांना आम्हाला काढावे लागेल, असा स्पष्ट इशारा कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युली स्वीट यांनी दिला आहे. जे कर्मचारी नवी तंत्रवैज्ञानिक कौशल्ये आत्मसात करतील, विशेषत: कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचा स्वीकार करुन ते आत्मसात करतील, त्यांना भवितव्य उज्ज्वल आहे. तथापि, असे करणाऱ्याही सर्व कर्मचाऱ्यांना कंपनी सामावून घेण्याची शक्यता कमी आहे, अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली आहे.