जपानमध्ये मोठा भूकंप, सुनामीचा इशारा
वृत्तसंस्था / टोकियो
जपानमध्ये मोठा भूकंप झाला असून त्यामुळे सागरतटीय भागांना सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. रिष्टर मापकावर या भूकंपाची तीव्रता 7.6 इतकी नोंद करण्यात आली आहे. तथापि, या भूकंपामुळे जिवीत हानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त देण्यात आलेले नाही. जपानच्या होकायडो बेटाच्या नजीक समुद्रतळाच्या खाली या भूकंपाचे केंद्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे होकायडो ओमोरी आणि इटावे या सागरतटांवर 3 मीटर उंचीच्या लाटा येऊ लागल्याने तेथे राहणारे लोक भयभीत झाल्याचे दिसून येत होते. अनेक लोकांनी सुरक्षित स्थानी जाण्यासाठी प्रयत्नांना प्रारंभ केला आहे. जपानच्या प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी 11 च्या आसपास भूकंपाचे मोठे धक्के जपानच्या उत्तर आणि पूर्व भागांना जाणवले. त्वरित नागरीकांना धोक्याचा इशारा देण्यात आला.
भूकंपाच्या मुख्य झटक्यानंतर काही काळ लहान हादरे बसलेले होते. या भूकंपाची तीव्रता मोठी असली, तरी त्यामुळे जिवीत हानी झाली नाही. काही इमारतींना तडे गेल्याचे वृत्त आहे. मात्र, काही किरकोळ अपवाद वगळता मालमत्तेची हानीही झालेली नाही. जपानमध्ये मोठ्या भूकंपांमध्येही सुरक्षित राहतील, अशा वास्तू आणि इमारती निर्माण करण्यात येतात. त्यामुळे त्यांची फारशी हानी होत नाही. मुख्य धोका सुनामीचाच असतो, अशीही माहिती देण्यात आली आहे. जपानच्या मध्यवर्ती प्रशासनाने आपदा निवारण आणि साहाय्यतेच्या कार्याला प्रारंभ केला असून मंगळवारपर्यंत परिस्थिती सुरळीत होईल, असा विश्वास व्यक्त केला