भारत-अमेरिकेदरम्यान मोठा संरक्षण करार
पुरवठा सुरक्षा करारावर स्वाक्षरी : दोन्ही देशांना होणार लाभ
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिका आणि भारताने पुरवठा सुरक्षा व्यवस्था (सिक्युरिटी ऑफ सप्लाय अरेंजमेंट) करारावर स्वाक्षरी केली आहे. हा करार अमेरिकेचा संरक्षण विभाग आणि भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयादरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान 22 ऑगस्ट रोजी झाला आहे. हा करार द्विपक्षीय संरक्षण संबंधांना चालना देत दोन्ही देशांना राष्ट्रीय सुरक्षा आवश्यकता पूर्ण करण्यासाठी परस्परांकडून आवश्यक औद्योगिक साधनसामग्री प्राप्त करण्यास सक्षम करणार आहे.
या करारामुळे अमेरिका आणि भारत राष्ट्रीय सुरक्षेला प्रोत्साहन देणाऱ्या सामग्री तसेच सेवांसाठी परस्परांना सहाय्य प्रदान करण्यावर सहमत झाले आहेत. हा करार संकटकाळासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे, कारण त्या काळात कुठल्याही देशाच्या तत्काळ गरजा असतात. हा करार आता दीर्घकालीन पुरवठा साखळी स्थैर्याला चालना देणार असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.
वॉशिंग्टन डीसीमध्ये दोन महत्त्वपूर्ण दस्तऐवजांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे. पुरवठा सुरक्षा व्यवस्थेद्वारे (एसओएसए) अमेरिका आणि भारत राष्ट्रीय सुरक्षेला बळ देणाऱ्या सामग्री आणि सेवांसाठी पारस्परिक प्राथमिकता समर्थन देण्यासाठी सहमत झाले आहेत असे उद्गार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी एक पोस्ट करत काढले आहेत.
पुरवठा सुरक्षा व्यवस्था दोन्ही देशांच्या संरक्षण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण आहे. तसेच अमेरिका-भारत संरक्षण तंत्रज्ञान आणि व्यापार पुढाकाराला (डीटीटीटीआय) मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने म्हटले आहे.
दोन्ही देशांसाठी लाभदायक
या करारानुसार अमेरिका संरक्षण प्राथमिकता आणि वितरण प्रणालीच्या (डीपीएएस) अंतर्गत भारताला आश्वासन प्रदान करणार आहे. याच्या बदल्यात भारत औद्योगिक आधारासोबत एक व्यवस्था उभारणार आहे. हा करार शांतताकाळ, आपत्कालीन स्थिती आणि सशस्त्र संघर्षांमध्ये पुरवठा साखळीच्या मुद्द्यांना संबोधित करण्यासाठी प्रक्रिया स्थापन करतो. हा करार संरक्षण विभागाला अशा देशाच्या कंपन्यांसोबत करार करण्यास सक्षम करतो, ज्याच्यासोबत हा करार करण्यात आला आहे. या करारात एक प्रतिबद्धता असून ती दोन्ही देशांना गरज भासल्यास महत्त्वपूर्ण पुरवठा, खनिजे आणि तंत्रज्ञानांपर्यंत जलदपणे पोहोच प्रदान करते.
राजनाथ सिंह दौऱ्यावर
भारत अमेरिकेचा 18 वा एसओएसए भागीदार आहे. भारत आणि अमेरिकेच्या या कराराची घोषणा मागील वर्षी लॉयड ऑस्टिन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अमेरिका-भारत संरक्षण औद्योगिक सहकार्यासाठी एका नव्या रोडमॅपच्या हिस्स्याच्या स्वरुपात करण्यात आली होती. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे सध्या 26 ऑगस्टपर्यंत अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. त्यांचा हा दौरा ऑस्टिन यांच्या निमंत्रणानुसार होत आहे. राजनाथ सिंह हे गुरुवारी वॉशिंग्टन येथे पोहोचले. स्वत:च्या दौऱ्यादरम्यान राजनाथ सिंह हे अमेरिकेचे संरक्षणमंत्री ऑस्टिन आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहेत.