For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उभ्या ऊसपिकात गव्यांचा हैदोस

10:55 AM Jul 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
उभ्या ऊसपिकात गव्यांचा हैदोस
Advertisement

बेकिनकेरेत शेतकऱ्यांना फटका, कोवळ्या भाताचेही नुकसान

Advertisement

बेळगाव : बेकिनकेरे येथील डोंगरपायथ्याशी असलेल्या शिवारात गव्याच्या कळपाने ऊस आणि कोवळ्या भातपिकाचे मोठे नुकसान केले आहे. यामध्ये साजन आण्णाप्पा राजगोळकर आणि इतर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. एकीकडे पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असतानाच गव्यांनी हैदोस घालून नुकसान केले आहे. वनखात्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात ऊस, भात, बटाटा, भुईमूग, सोयाबीन आणि इतर भाजीपाल्याची लागवड केली आहे. या पिकात गव्यांचा कळप धुडगूस घालू लागला आहे. डोंगर भागातून रात्रीच्या वेळी गवे येऊन पीक फस्त करू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. विशेषत: उभ्या ऊस पिकात हैदोस घालून नासधूस केली आहे. त्याबरोबर कोवळ्या भातपिकाचेही नुकसान केले आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वनखात्यालाही गांभीर्य नसल्याने दरवर्षी नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याची खंतही शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 हैदोस घातल्याने पीक जमीनदोस्त

Advertisement

डोंगरपायथ्याशीच शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने गवे, रानडुक्कर, साळिंद्र, तरस आदी वन्यप्राण्यांकडून नुकसान होऊ लागले आहे. शुक्रवारी रात्री गव्याच्या कळपाने शिवारातील ऊस, भात पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोवळे भातपीक पायाखाली गेल्याने ते वर येणे फार कठीण असते. त्यामुळे आता काय खावे? असा प्रश्नही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसमोर पडला आहे. जवळजवळ एक एकर क्षेत्रातील ऊसपिकात हैदोस घातल्याने पीक जमीनदोस्त झाले आहे.

वन खात्याकडून टाळाटाळ

शुक्रवारी रात्री गव्यांचा कळप येऊन एक एकर क्षेत्रातील उसाचे नुकसान केले आहे. त्याबरोबर शेजारी असलेल्या भातपिकातही कळपाने हैदोस घातला आहे. याबाबत वनखात्याकडे संपर्क साधला असता टाळाटाळीची उत्तरे दिली जात आहेत. प्रशासन आमच्याकडे लक्ष कधी देणार?

-साजन राजगोळकर (नुकसानग्रस्त शेतकरी)

Advertisement
Tags :

.