महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोंढा वनविभागातील हत्तीकडून भातपिकाचे मोठे नुकसान

10:14 AM Nov 15, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी हतबल, वनविभागाकडून बंदोबस्ताची मागणी : हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचा हत्तीकडून फडशा

Advertisement

खानापूर : तालुक्यातील लेंढा वनविभागातील मुंडवाड, माचाळी, सातनाळी भागात गेल्या चार दिवसांपासून एका हत्तीने धुमाकूळ घातला असून हातातेंडाशी आलेले भातपीक हा हत्ती फडशा पाडत आहे. हत्तीला पिटाळून लावण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. मात्र हत्ती गेल्या चार दिवसांपासून याच भागात तळ ठोकून असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. वनखात्याने या हत्तीचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Advertisement

भात पिकाच्या कापणीचा हंगाम जोरदार सुरू आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांनी भातपीक पाणी लावून वाचवले होते. मात्र भात पिकाचा उतारा म्हणावा तसा नाही. उन्हाच्या तडाख्मयातून वाचलेले भात शेतकरी कापून मळणी करून घरी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. असे असताना लोंढा वनविभागातील सातनाळी, माचाळी, मुंडवाड यासह आसपासच्या गावातून हत्तीच्या कळपाने भात पिकाचा फडशा पाडला आहे. मात्र या कळपातून चुकलेला एक हत्ती गेल्या आठवड्यापासून याच भागात राहिला आहे. हा हत्ती रोज सायंकाळी भात पिकात शिरुन हातातोंडाशी आलेल्या भात पिकाचा फडशा पाडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या हत्तीला जंगलात पिटाळून लावण्यासाठी शेतकरी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र हत्ती भातपीक सोडून जाण्यास तयार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

हत्तीच्या वास्तव्यामुळे शेतकरी भात कापणीसाठी शेताकडे जाण्यासाठी धजावत आहेत. त्यामुळे भात पिकाचे नुकसान होत आहे. वनखात्याने या हत्तीचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे. यावर्षी पाऊस अत्यंत कमी झाल्याने शेतकऱ्यांनी आपले भात प्रयत्न करून वाचवलेले आहे. भात पिकाचा उतारा 50 टक्क्यानी घटला असून त्यातच हत्तीच्या वास्तव्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून याबाबत वनखात्याने नुकसान भरपाईचे पंचनामे तरी वेळेवर करावे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन कामे करावीत

याबाबत लोंढा वन विभागीय अधिकाऱ्यांना विचारले असता, ते म्हणाले, कळपातील हत्ती चुकल्याने आपल्या चाऱ्यासाठी तो याच भागात वास्तव्यास आहे. आम्ही त्याला पुन्हा त्याच्या विजनवासात घालवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. मात्र हा हत्ती भातपीक सोडून जाण्यास तयार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी खबरदारी घेऊन भात पिकाची कापणी करावी, नुकसानीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असून सरकारच्या नियमानुसार नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल, असे सांगितले. तालुक्यातील पश्चिम आणि दक्षिण भागातील शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या वास्तव्यामुळे शेती करणे कठीण बनले आहे. गेल्या काही वर्षापासून जंगलात प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. यात गवे, रानडुकर, चित्तळ, मेरु, मोर यासह इतर प्राण्यांच्या त्रासामुळे शेतीचे प्रचंड नुकसान होत आहे. शेती टिकवण्यासाठी काबाडकष्ट करुनही पीक आल्यानंतर वन्यप्राण्यामुळे पीक घरी येऊन लागेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे वनविभागाने तातडीने या वन्यप्राण्यांचा योग्यरितीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

जंगलातील चारा-पाणी संपल्याने शेतातील पिकांकडे मोर्चा

यावर्षी सरासरीपेक्षा 70 टक्के पाऊस कमी झाल्याने जंगलातील चारा आणि पाणी आताच कमी झाल्याने सर्वच वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा शेतातील पिकाकडे वळवलेला आहे. त्यामुळे पुढील काही महिने शेतकऱ्यांना या वन्य प्राण्यापासून जोखीम स्वीकारावी लागणार आहे. वन्यप्राणी चाऱ्याच्या आणि पाण्याच्या शोधासाठी निश्चितच जंगलातून बाहेर येण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी वनविभागाने शासकीय योजनेतून जंगलात पाण्यासाठी तळी तयार करणे गरजेचे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article