तामिळनाडूत मोठा भ्रष्टाचार उघडकीस
वृत्तसंस्था / चेन्नई
दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड येथे उघडकीस आलेल्या मोठ्या मद्य घोटाळ्यांच्या नंतर आता तामिळनाडूमध्येही 1 हजार कोटी रुपयांचा एक मद्य घोटाळा उघडकीस आला आहे. प्रवर्तन निदेशालयाने (ईडी) या घोटाळ्याचा भांडाफोड केला असून तामिळनाडू सरकारमधील एक मंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्यापर्यंत या घोटाळ्याचे धागेदोरे पोहचत आहेत, असा आरोप केला जात आहे.
बालाजी यांच्या हातात सध्या वीजनिर्मिती, दारुबंदी आणि उत्पादन शुल्क अशी महत्वाची खाती आहेत. हा घोटाळा दारुबंदी आणि उत्पादनशुल्क या विभागांशी संबंधित आहेत. हा घोटाळा ‘टास्मॅक’ घोटाळा म्हणून परिचित होत आहे. ईडीने या संदर्भात तामिळनाडूत अनेक स्थानांवर धाडी घातल्या आहेत. त्यातून राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, मद्य उत्पादक आणि मद्य वितरक यांचे संगनमत उघड होत आहे, असे ईडीचे म्हणणे आहे. या घोटाळ्यासंदर्भात लवकरच आरोपपत्र सादर केले जाणार असून अनेकांची यामुळे कोंडी होईल, अशी शक्यता आहे.
टास्मॅकचा अर्थ काय...
तामिळनाडू स्टेट मार्केटिंग कॉर्पोरेशन लिमिटेड या राज्य सरकारच्या आधीन असणाऱ्या व्यापारी संस्थेच्या माध्यमातून हा घोटाळा करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे तो टास्मॅक या लघुनावाने ओळखला जात आहे. या व्यापारी संस्थेच्या माध्यमातून वाजवीपेक्षा अधिक किमतीला मद्याची खरेदी करण्यात आली. तसेच न खरेदी केलेल्या मद्याचीही नोंद खरेदी केलेल्या मद्याप्रमाणे करण्यात आली. शेकडो कोटी रुपयांच्या या महाग आणि बनावट खरेदीतून मद्य उत्पादकांना मिळालेले पेसे किकबॅकस्च्या स्वरुपात राजकारणी, प्रशासकीय अधिकारी आणि संबंधितांना वाटण्यात आले, असे ईडीने याची माहिती देताना स्पष्ट केले. टास्मॅकने मद्य विक्रीची अनुमतीपत्रे देतानाही नियमांचा भंग केला असून अतिरिक्त पैशाचा व्यवहार ही अनुमतीपत्रे वितरीत करताना झाला असल्याचा आरोप आहे. प्रशासकीय अधिकारी आणि टास्मॅकचे अधिकारी यांचा थेट संबंध प्रस्थापित करण्याइतका पुरावा आमच्या हाती आला आहे, असे प्रतिपादन ईडीने केले आहे.
बालाजी यांचा इन्कार
तामिळनाडूचे मंत्री सेंथिल बालाजी यांनी आरोपांचा इन्कार केला आहे. आम्ही न्यायालयातच आमचे निर्दोषित्व सिद्ध करु. ईडी केंद्र सरकारच्या इशाऱ्यावरुन आमच्यावर खोटे आरोप लावत आहे. आमच्या सरकारची बदनामी करण्यासाठी हे कुभांड रचण्यात आलेले आहे. मात्र, आम्ही दबावाखाली येणार नाही. मद्य व्यवहारात कोणताही घोटाळा नाही. मात्र, गैरव्यवहार झाल्याचा आभास निर्माण करण्यात येत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी शुक्रवारी व्यक्त केली आहे.