जुबिन गर्ग मृत्यूप्रकरणी मोठी कारवाई
चुलत भावालाच अटक : आरोपी आसाममध्ये पोलीस उपअधीक्षक
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
गायक जुबिन गर्ग यांच्या मृत्यूप्रकरणाचा तपास करणाऱ्या आसाम पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एसआयटीने गायकाचा चुलत बंधू संदीपन गर्गला अटक केली आहे. संदीपन हा आसाम पोलीस विभागात उपअधीक्षक पदावर कार्यरत आहे. तो जुबिन यांच्यासोबत सिंगापूर दौऱ्यावर गेला होता. जुबिनचा 19 सप्टेंबर रोजी याच पार्टीदरम्यान बुडून मृत्यू झाला होता.
जुबिन यांच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत 5 जणांना अटक करण्यात आली आहे. संदीपन देखील जुबिन यांच्यासोबत सिंगापूर येथे गेला होता आणि त्याचा हा पहिला विदेश प्रवास होता. याच पार्टीत देखील तो सामील होत आणि घटनेनंतर जुबिन यांच्याशी निगडित सामग्री तोच भारतात घेऊन आला होता. 5 दिवसांच्या चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांचे सांगणे आहे.
बुधवारी चौकशीनंतर संदीपनला अटक करण्यात आली आहे. तपास अद्याप सुरू असल्याने याविषयी अधिक खुलासा करता येणार नाही. आरोपीला न्यायालयासमोर हजर करत पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे आसाम सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक मुन्ना गुप्ता यांनी सांगितले आहे.
यापूर्वी पोलिसांनी 2 ऑक्टोबर रोजी जुबिन यांच्या बँडमध्ये सामील शेखर ज्योति गोस्वामी, अमृतवर्व महंतला अटक केली होती. हे दोघेही सिंगापूरमध्ये आयोजित याच पार्टीत सामील होते. गोस्वामीला जुबिननजीक पोहताना पाहिले गेले होते. तर महंतकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात होते. तसेच जुबिन यांचा व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि फेस्टिव्हल मॅनेजर श्यामकनु महंत यांनाही अटक करण्यात आली आहे.