Satara | फलटण प्रकरणात मोठी कारवाई ; निलंबित उपनिरीक्षक गोपाल बदने पोलीस सेवेतून बडतर्फ
पोलीस प्रतिमेला धक्का, बदने पोलीस सेवेतून बडतर्फ
फलटण : येथे डॉक्टर तरुणीने तळहातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्याच्यावर आता कारवाई करण्यात आली आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात बदने याच्या नावाचा उल्लेख आल्याने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी बदने याला पोलीस खात्यातून बडतर्फ केले आहे. बदने सध्या न्यायालयीन कोठडीत असून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.
हातावर सुसाईड नोट
महिला डॉक्टरने आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या हातावर एक सुसाईड नोट लिहिली होती. माझ्या मृत्यूसाठी पीएसआय गोपाल बदने हा जबाबदार आहे. त्याने चार वेळा माझ्यावर अत्याचार केला. तसेच प्रशांत बनकर यांनीही गेल्या चार महिन्यापासून माझ्झा मानसिक छळ केला अशी तक्रार या महिला डॉक्टरने सुसाईड नोटमध्ये केली होती. बदने गेल्या दोन वर्षापासून फलटण पोलीस ठाण्यात कार्यरत होता.
त्याआधी बरह पोलीस ठाण्यामध्ये त्याने सेवा बजावली. गोपाळ बदने हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील चांदापूर गावचा रहिवासी आहे. डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणात पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली होती. त्यांचा तपास पारदर्शी नाही अशी फलटणमधील लोकांची भावना झाली होती.
या संदर्भात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप सुद्धा झाले. त्यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यासह सर्व महाराष्ट्रामध्ये या प्रकरणाचे प्रचंड पडसाद उमटले. डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणाची तपासाची कमान आता पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे आहे. पोलीस दलाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका ठेवत बदने याला पोलीस सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. ही अत्यंत कठोर कारवाई मानली जात आहे.