माजगाव ग्रामसभेत स्मार्ट मीटर विरोधात एकमुखी ठराव
सावंतवाडी | प्रतिनिधी
माजगाव गावात स्मार्ट मीटर कुठल्याही परिस्थितीत बसवू नये. स्मार्ट मीटरला प्रत्येक घराघरात लोकांचा विरोध आहे. हा विरोध पाहता वीज वितरण कंपनीने कोणतेही धाडस करू नये. जर स्मार्ट मीटरची सक्ती करताना विशिष्ट परिस्थिती उद्धभवल्यास त्याला वीज वितरण कंपनी जबाबदार राहील असे सरपंच रिचर्ड डिमेलो यांनी स्पष्ट केले. माजगाव येथे खास ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेत स्मार्ट मीटर विरोधाचा एकमुखी ठराव घेण्यात आला यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. रेश्मा सावंत, माजी सभापती अशोक दळवी ,माजी उपसरपंच संजय कानसे ,ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सध्या सर्वत्र स्मार्ट वीज मीटर वीज वितरण कंपनी बसवत आहे. हे वीज मीटर सर्वसामान्य, गोरगरीब वीज ग्राहकांना डोकेदुखी ठरत आहेत. भरमसाठ वीज बिले काही ठिकाणी येत आहेत. हे स्मार्ट वीज मीटर म्हणजे लोकांचा आर्थिक खिसा लुटण्याचा हा डाव आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आमच्या गावात स्मार्ट वीज मीटर बसविण्यात येऊ नयेत असे यावेळी ग्रामस्थांनी या ग्रामसभेत स्पष्ट केले सरपंच श्री डिमेलो यांनी तसा एकमुखी ठराव घेतला आहे. वीज वितरण कंपनीने गावात कुठल्याही परिस्थितीत स्मार्ट वीज मीटर बसवू नये याला आमचा विरोध आहे तसा ठराव वीज वितरण कंपनीला पाठवण्यात आला आहे. तसेच या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजनांबाबतमाहिती देण्यात आली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतीमार्फत शासनामार्फत राबविण्यात येणार्या विशेष योजनांची माहिती देण्यात आली.सदर योजना ग्रामीण भागातील तळागाळातील लोकापर्यंत पोहोचविणे हा उद्देश असून जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने जिल्हास्तर ,तालुकास्तर ,गावस्तरावर नियोजन करण्यात आले आहे. ग्रामपंचायत माजगाव १५ वा वित्त आयोग योजनेंतर्गत शिक्षण ,आरोग्य ,उपजिविका अंतर्गत गावातील आरोग्य उपकेंद्राला औषध पुरवठा करणे,वॉटर फिल्टर बसविणे,सर्व जिल्हा परिषद शाळांना टी.व्ही संच ,डझबिन,साऊंड सिस्टीम तसेच अंगणवाडी शाळांना डझबिन,गणवेश पुरविणे ,वॉटर कूलर पुरविणे इ. साहित्य ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात आल्याची माहिती देण्यात आली.