सभागृहाची सभ्यता राखा
सभापती, मुख्यमंत्री, वीजमंत्र्यांच्या आमदारांना सूचना : आक्षेपार्ह वागणाऱ्या आमदारांना दिला सबुरीचा सल्ला
पणजी : गोवा विधानसभेचे पावसाळी विधानसभा अधिवेशन सुरू आहे. यंदाच्या विधानसभा अधिवेशनाचे कामकाज आठ दिवसांचे पूर्ण झाले आहे. गेल्या आठ दिवसांमधील कामकाजांवर लक्ष घातले असता, आम्ही सर्वजण लोकप्रतिनिधी म्ङणून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडत आहोत. परंतु हे प्रश्न मांडताना काही लोकप्रतिनिधींकडून सभागृहाचे नियम, प्रक्रिया आणि सभ्यता याकडे दुर्लक्ष करून व्यक्तीश: स्वऊपात ते मांडले जात आहे. हा प्रकार संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार, सभागृहातील नियमांकडे दुर्लक्ष करण्यासारखा आहे. म्हणून विधानसभा सभागृहाची सभ्यता प्रत्येकांनी राखावी, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल सोमवारी दिली.
विधानसभा सभागृहात प्रश्नोत्तराच्या तासाच्या शेवटी मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभा सभागृहाचे पावित्र्य जपले जावे आणि ती प्रत्येकाची जबाबदारी आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कायद्यामध्ये आवश्यकत्या गोष्टी याव्यात, यासाठी सभागृहात वेळोवेळी चर्चा होते आणि हे सर्व करीत असताना सभागृहात मांडण्यात येणाऱ्या मागण्या, प्रश्न आदी विधानसभा सभागृहाची सभ्यता राखूनच विचारले जावेत, अरे-तुरे किंवा विधानसभा अध्यक्षांच्याबाजूने कागदपत्रे भिरकावून विचारले जाऊ नयेत, याकडे मुख्यमंत्री सावंत यांनी लक्ष वेधले.
संसदीय नियम व प्रक्रिया संहिता
‘संसदीय नियम आणि प्रक्रिया संहिता’ हे पुस्तक नव्या लोकप्रतिनिधींनीही वाचायला हवे. कारण या पुस्तकात लोकशाही आणि संविधानाला धरून विधानसभा सभागृहातील कामकाज कशापद्धतीने चालावे, यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले आहे. आम्ही सभागृहात वैयक्तिकरित्या आरोप-प्रत्यारोप करीत असल्याचे दृष्टीस येत आहे. आम्ही या सभागृहाचे कामकाज चालावे, यासाठी सर्वांनी नियम पाळायला हवेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री सावंत यांनी विधानसभा सभागृहात प्रत्येक लोकप्रतिनिधींनी सभ्यता पाळावी, असे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनीही सभापती तवडकर यांच्याकडे मुख्यमंत्री सावंत यांनी खुणवाखुणवी आणि इशारे करणे थांबवायला हवे, अशी मागणी केली.
सभागृह अध्यक्षांचा अवमान नको
सभागृहात कशापद्धतीने मागण्या किंवा चर्चा असावी, यासाठी संसदेने काही नियम घालून दिलेले आहेत. सभापतींची खुर्ची ही सर्वात महत्त्वाची आहे. त्यामुळे या पदावर राहणाऱ्या व्यक्तीचा अवमान होता कामा नये. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार तुम्ही सरकारच्या निर्णयावर विरोध करू शकता, हा विरोधकांचा अधिकार जरी असला तरी विधानसभा सभागृह अध्यक्षांचा अपमान होईल, अशा प्रकारचे वर्तन होता कामा नये.
कागदपत्रे भिरकावणे लोकशाहीला घातक : सभापती
सभागृहातील सभापतीच्या आसनासमोर येऊन कागदपत्रे भिरकावणे हे लोकशाहीला घातक आहे. हा प्रकार योग्य नव्हे. काही आमदार तर ज्येष्ठ नेत्यांनाही ‘अरे-तुरे’ची भाषा वापरतात त्यामुळे असे वर्तन बरोबर नाही, असे सभापती रमेश तवडकर यांनी युरी आलेमाव, विजय सरदेसाई यांच्याबरोबरच इतर आमदारांनाही सांगत मुख्यमंत्री सावंत यांचा सभागृहातील सभ्यतेविषयीचा मुद्दा उचलून धरला.
सुदिन ढवळीकर यांनी दिला सबुरीचा सल्ला
25 वर्षे मी सभागृहात आहे. युरी आलेमाव यांचे चुलते आणि वडील हेही या सभागृहाचे सदस्य होते. परंतु मी माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत कोणत्याच दिवशी युरी आलेमाव यांचे वडील आणि चुलते यांच्याकडून चुकीचा व्यवहार झालेले पाहिले नाही. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांचे शिक्षण चुलते आणि वडिलांपेक्षाही उच्च दर्जाचे असूनही त्यांच्याकडून असा प्रकार घडत असल्याने हे सभागृहाच्या विऊद्ध आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबरच इतर आमदारांनीही विधानसभा सभागृहात प्रश्न मांडताना सबुरीने घ्यायला हवे, असे ज्येष्ठ नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभा सभागृहात सांगितले.