कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजा टाईल्स-करंबळ क्रॉस रस्ताकामाचा दर्जा राखा

12:12 PM Dec 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अन्यथा काम बंद पाडण्याचा इशारा : रस्त्याच्या दर्जाबाबत नागरिकांतून नाराजी : आराखड्यानुसार काम होत नसल्याची तक्रार

Advertisement

खानापूर : एकात्मक विकास योजनेतून राजा टाईल्स ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली आहे. रुमेवाडी ते करंबळ क्रॉसपर्यंतच्या रस्त्याचे क्राँक्रीटीकरण सुरू करण्यात आले आहे. मात्र राजा टाईल्स ते मऱ्याम्मा मंदिरपर्यंत तसेच करंबळ क्रॉस ते रुमेवाडी क्रॉसनजीकपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे रस्त्याचा दर्जा तसेच आराखड्यानुसार रस्त्याचे काम होत नसल्याने शहरातील नागरिकांनी व वकील संघटना, म. ए. समितीकडून रस्त्याच्या कामावर आक्षेप नोंदवण्यात आला असून जर कंत्राटदाराने आराखड्यानुसार काम केले नसल्यास या विरोधात लोकायुक्त तसेच संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार असून आराखड्यानुसार काम होत नसल्यास काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Advertisement

करंबळ क्रॉस ते राजा टाईल्सपर्यंतचा रस्ता महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत होत्या. मात्र महामार्ग प्राधिकरणाने या रस्त्याच्या विकासासाठी 14 कोटीचा निधी मंजूर करून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करून घेण्यासाठी निधी हस्तांतरित केला आहे. त्यामुळे या रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून नियोजन करण्यात येत आहे. कंत्राटदाराने या रस्त्याचे काम गेल्या महिन्याभरापूर्वी सुरू केले आहे. नदी पुलापासून ते करंबळ दरम्यान 1 कि. मी.चे काँक्रीटीकरण केले आहे. मात्र त्या पुढून ते करंबळ क्रॉसपर्यंत डांबरीकरण काले आहे. तसेच शनिवारी सकाळी मऱ्याम्मा मंदिर ते राजा टाईल्सपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम हाती घेतले होते.

यावेळी शहरातील जागरूक नागरिकांनी तसेच वकील संघटना, म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते मुरलीधर पाटील प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाच्या ठिकाणी जाऊन कंत्राटदाराला जाब विचारला. मात्र यावेळी कंत्राटदारांच्या कर्मचाऱ्यांकडून अरेरावीची उत्तरे देण्यात आली. यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी संजय गस्ती यांच्याशी संपर्क साधून याबाबत जाब विचारुन त्यांना रस्ता कामाच्या ठिकाणी पाचारण केले. डांबरीकरणबाबत विचारले असता संजय गस्ती यांच्याकडूनही योग्य उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे कंत्राटदारानी या रस्त्याचे श्रेय घेणारे साटेलोटे करत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

या रस्त्यासाठी 14 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यात 4.3 कि. मी. चा रस्त्याचा विकास करण्यात येणार आहे. यात नदी पुलापासून ते मऱ्याम्मा मंदिर हा 1.25 एवढा रस्ता दुपदरीकरणाचा आहे. बाकी रस्ता फक्त पाच मीटरचे काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. रस्त्याच्या विकासासाठी इतका मोठा निधी मंजूर होऊनदेखील कामाचा दर्जा योग्य राखण्यात येत नसल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या कामाचे श्रेय लाटण्यासाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये महिन्याभरापासून चढाओढ सुरू आहे. मात्र कामाच्या दर्जाबाबत दोन्ही पक्षाच्या नेत्याकडून याबाबत कोणताही आवाज उठवण्यात येत नसल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या रस्त्याचा विकास महामार्ग प्राधिकरणाकडून  करण्यात आला असता तर रस्त्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले असते, अशी प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे. आराखड्यानुसार संपूर्ण रस्त्याचे काँक्रीटीकरण आणि दोन्ही बाजूने गटारी तसेच आंबेडकर उद्यान ते हेस्कॉम कार्यालयापर्यंत फुटपाथ आणि गटारींचे काम करणे गरजेचे आहे. मात्र मऱ्याम्मा मंदिर ते राजा टाईल्सपर्यंत डांबरीकरण करण्यात येत आहे. तसेच करंबळ क्रॉसपासून पहिल्या सीडीपर्यंत डांबरीकरण करण्यात येत आहे. कंत्राटदाराकडून आराखड्यानुसार काम सुरू नसल्याने या कामाला विरोध करण्यात येत आहे.

नागरिकांनी जागरूक राहून रस्ता काम करून घ्यावे

राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस या रस्त्याच्या बांधकामासाठी 14 कोटी इतका निधी मंजूर झाला आहे. संपूर्ण रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार म्हणून गाजावाजा करण्यात आला होता. याबाबत भाजपकडून श्रेय लाटण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करण्यात आले होते. शहरामधून जाणाऱ्या या महामार्गाच्या विकासामुळे शहराची शोभा वाढणार आहे. हा रस्ता गोवा, हल्याळ तसेच विविध राज्यांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून ओळखला जातो. मात्र आराखड्यानुसार काम होत नसल्याने रस्ता काही दिवसात उद्ध्वस्त होणार आहे. त्यानंतर रस्त्याच्या विकासासाठी इतका मोठा निधी कधीच उपलब्ध होणार नाही. यासाठी शहरातील नागरिकांनी जागरुक राहून या रस्त्याचे आराखड्यानुसार काम करून घेणे गरजेचे आहे.

- ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष-अॅड. ईश्वर घाडी

आराखड्यानुसार काम नाही : डोळ्यात धूळफेक

सुरुवातीपासूनच रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत सांशकता व्यक्त होत होती. यासाठी गेल्या महिन्याभरापूर्वी आम्ही मोर्चा काढून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देवून रस्त्याच्या कामाचा दर्जा राखावा आणि आराखड्यानुसार काम करावे, अशी मागणी केली होती. मात्र कंत्राटदार आणि सार्वजनिक बांधकाम अधिकारी यांचे संगनमत असून आराखड्यानुसार काम करण्यात येत नसून फक्त डोळ्यात धूळफेक करून निधी लाटण्याचे काम सुरू आहे. रस्त्यासाठी 14 कोटी निधी मंजूर झाला आहे. हा निधी मंजूर करून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. म्हणून काँग्रेस आणि भाजपने डांगोरा पिटवत श्रेय लाटण्यासाठी चढाओढ सुरू होती. मात्र दर्जाबाबत आणि आराखड्यानुसार काम होत नसताना दोन्ही पक्षाचे नेते मात्र डोळेझाक करत आहेत. एकदा काम पूर्ण झाल्यानंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

-म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते-मुरलीधर पाटील

दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी शहराच्या विकासासाठी प्रयत्न करावेत

राजा टाईल्स ते करंबळ क्रॉस हा रस्ता महामार्गाच्या विकासासाठी केंद्राच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून 14 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाकडूनच रस्त्याचे काम होणे गरजेचे होते. मात्र खासदार आणि आमदार आणि शासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी तसे होऊ न देता रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडून करण्यात यावे, यासाठी नियोजन केले आहे. रस्त्याचे श्रेय लाटण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र आराखड्यानुसार काम करण्यात येत नाही. तसेच कामाच्या दर्जा राखण्यात येत नाही. याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे कंत्राटदार आणि भाजप, काँग्रेस नेत्यामध्ये काही साटेलोटे आहे का, असा संशय नागरिकांतून व्यक्त होत आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यानी शहराच्या विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे.

-सामाजिक कार्यकर्ते-महादेव घाडी 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article