फोंड्यातील मुख्य नाल्याला घातक प्रदूषणाचा विळखा
नाल्यात रासायनिक पाण्याचे विसर्जन : तक्रारी कऊनही कारवाई नाहीच
फोंडा : बेतोडा भागातून उगम पावणारा आणि कुर्टी पंचायत तसेच फोंडा शहरातून कवळे व बांदोड्यापर्यंत जाऊन जुवारी नदीला मिळणारा मुख्य नाला घातक रसायने व अन्य प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. नाल्यावर होणाऱ्या या प्रदूषणाच्या माऱ्यामुळे बेतोड्यासह कुर्टी व अन्य भागातील शेती बागायती तसेच त्यावर अवंबून असलेल्या जीवसृष्टीवर गंभीर परिणाम दिसू लागले आहेत. कुर्टी भागातील काही बागायतदारांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह अन्य संबंधीत खात्यांना तक्रारी कऊनही हे प्रकार थांबलेले नाहीत.
बेतोड्यातून उगम पावणारा हा मुख्य नाला म्हणजे फोंड्याची जीवनवाहिनी असून या भागातील बरीच शेती आणि बागायती नाल्याच्या जलस्रोतावर पिकवली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून या नाल्यात आस्थापनांतील घातक रसायनमिश्रीत सांडपाणी तसेच आसपासच्या लोकवस्तीमधून शौचालयाची घाण थेट विसर्जित केली जाते. या प्रदूषणामुळे नाल्यातील पाणी काळपट झाले असून पाण्याला विशिष्ट प्रकारची दुर्गंध येत आहे. बेतोड्याहून कुर्टी पंचायत क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या या नाल्याचे पाणी काही ठिकाणी बागायतीला वापरले जाते. त्यामुळे पोफळीची कुळागरे व अन्य बागायतीवर या प्रदूषित पाण्याचा परिणाम होताना दिसत आहे. नाल्यातील मासे तसेच त्यावर अलंबून असलेली अन्य जीवसृष्टी या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे.
बऱ्याचठिकाणी मोठ्या प्रमाणात मासे मरण्याचे प्रकारही आढळून आले आहेत. पाण्याच्या काळपट रंगामुळे नाल्यावर दुषित पाण्याचा मारा होत असल्याचे स्पष्ट दिसत असून काही स्थानिक नागरिक व शेतकऱ्यांनी त्याविरोधात वारंवार तक्रारी कऊनही संबंधीताकडून दखल घेतली जात नाही. एवढ्या मोठ्याप्रमाणात नाल्याचे प्रदूषण होत असताना प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य यंत्रणांच्या सुस्त कारभारावर आता शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. नेमके शनिवारी व रविवारी सुट्टीच्या दिवशी हे प्रदूषित सांडपाणी थेट नाल्यामध्ये सोडले जात असल्याने स्थानिकांनी निदर्शनास आणून दिले आहे. बेतोड्यापासून बांदोड्यापर्यंत वाहणाऱ्या या नाल्यातील प्रदूषीत पाण्यामुळे कुर्टी खांडेपार, कवळे आणि बांदोडा पंचायतील शेतीवर लोकांनी शेती करण्याचे बंद केले आहे.