महिंद्रा लॉजिस्टीक चोरीप्रकरणी एकास अटक! तीन लाखाची रोकड हस्तगत, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
पुलाची शिरोली/वार्ताहर
शिये ( ता. करवीर ) येथील महिंद्र लाॅजिस्टीक मधिल चोरीप्रकरणी तेथील कामगारास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी अटक केली. पंकज कुंतीलाल कल्याणकर ( वय २३, रा. आर. के. नगर, कोल्हापूर ) असे अटक झालेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून रोख रक्कम रूपये तीन लाख सहा हजार हस्तगत करण्यात आले.
याप्रकरणी मिळालेली माहिती अशी की, शिये येथील हनुमान नगर मध्ये महिंद्रा लाॅजिस्टीकचे कार्यालय आहे. गुरुवारी ( दि. २९ आॅगस्ट ) रात्री अकरा ते शुक्रवारी ( दि. ३० ) दुपारी एकच्या दरम्यान चोरी झाली होती. यामध्ये तीन लाख चौदा हजार सहाशे तीन रुपयांची रोकड लंपास झाली होती. पंकज कल्याणकर हा महिंद्रा लाॅजिस्टीकचा कामगार आहे. त्याने कार्यालयाचा मागील दरवाजा उचकटून कार्यालयात प्रवेश केला. लाॅकरचे कुलुप काढून तेथील ठेवलेली सर्व रक्कम लंपास केली. याबाबत अज्ञात चोरट्यांविरुध्द व्यवस्थापक संजय बंडागळे यांनी शिरोली एमआयडीसी पोलिस ठाण्यात शनिवारी दि. ३१ रोजी फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून शिरोली एमआयडीसी व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपास केला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक रवींद्र कळमकर, राम कोळी, सागर माने, सोमराज पाटील, लखन पाटील, शुभम संकपाळ, परशुराम गुजरे यांनी ही कारवाई केली. औद्योगिक वसाहतीत पाच दिवसापूर्वी झालेली साठ लाखांची चोरी . यामुळे उद्योजक हवालदील झाले आहेत.तरी या गुन्ह्याचा तत्काळ उलघडा व्हावा. अशी अपेक्षा उद्योजकांच्यातून व्यक्त होत आहे.