महिला विद्यालय, ठळकवाडी विजयी
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित हनुमान चषक आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत सोमवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून महिला विद्यालयाने आर्मी पब्लीक स्कूलचा तर ठळकवाडी संघाने केएलई अथणीचा पराभव करुन प्रत्येकी दोन गुण मिळविले. प्रसन्ना शानभाग व विराज यांना सामनावीर पुरस्कार दिला. प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात महिला विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 गडी बाद 166 धावा केल्या. प्रसन्ना शानभागने 11 चौकारांसह 86, आर्यने 4 चौकारांसह 26 तर रजीत शंभूचेने 23 धावा केल्या. आर्मी स्कूलतर्फे अंश व अर्थवने प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आर्मी संघाने 20 षटकात 7 गडी बाद 92 धावा केल्या. अंश गवळीने 3 चौकारांसह 26, अथर्व पाटीलने 16, साई पाटीलने 12 धावा केल्या महिला विद्यालयातर्फे अथर्व 14-3, आर्य व रजतने प्रत्येकी 1 गडी बाद केला. दुसऱ्या सामन्यात ठळकवाडीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गाडी बाद 196 धावा केल्या. त्यात उमेश बेळगावकरने 4 चौकारांसह 50, मयुर जाधवने 6 चौकारांसह 43, प्रज्योत उघाडेने 6 चौकारांसह 33 तर श्री हुंदरेने 2 धावा केल्या. केएलई अथणीतर्फे सुपराजने 2, समर्थ व श्रवणने प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अथणीचा डाव 15.5 षटकात 50 धावांत आटोपला. भूषण सिंगदागीने 12, तर श्रवणने 10 धावा केल्या. ठळकवाडीतर्फे विराजने 9 धावांत 4, रोहीत व साईनाथने प्रत्येकी 2 तर प्रज्योतने 1 गडी बाद केला.