Solapur : सोलापूरकरांतर्फे पद्मावतीला माहेरची साडी अर्पण
आज पद्मावती देवीची लोटस मंगल कार्यालयात कुंकूमार्चना होणार
सोलापूर : तिरुपती येथील पद्मावतीदेवीला यंदा सोलापुरातील पद्मशाली बांधव सामूहिक देणगीतून 'पुट्टींटी पट्टचिरा' अर्थात माहेरची साडी अर्पण करणार आहेत. यानिमित्ताने पद्मावती देवीची शुक्रवार १४ रोजी लोटस मंगल कार्यालयात कुंकूमार्चना तर येथील व्यंकटेश्वर मंदिरात १५ ते १९ पर्यंत साडी दर्शन व देणगी दानाची सोय केली आहे, अशी माहिती पद्मशाली श्री पद्मावतीदेवी ब्रह्मोत्सवम संस्थेचे संस्थापक जनार्दन कारमपुरी व अध्यक्ष अंबादास बिंगी यांनी दिली.
तिरुपतीनजीकच्या तिरुचानूर येथील श्री पद्मावतीदेवी मंदिरात सालाबादप्रमाणे नोव्हेंबरमध्ये ब्रह्मोत्सव होणार आहे. सोलापूरकरांतर्फे पद्मावतीला माहेरची साडी या उत्सवात शुक्रवार २१ रोजी सोलापुरातील पद्मशाली समाजातील अनेक जोडपी देवीला माहेरची साडी अर्पण करणार आहेत. याशिवाय कामगार, समाजबांधवांच्या सामूहिक देणगीतून एक स्वतंत्र साडी अर्पण करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने शुक्रवार, १४ संध्याकाळी चार वाजता अशोक चौक, वालचंद कॉलेजसमोरील लोटस मंगल कार्यालय येथे पद्मावतीदेवीची कुंकूमार्चना करण्यात येणार आहे.
शनिवार १५ ते १९ पर्यंत दाजी पेठेतील व्यंकटेश्वर मंदिरात साडी दर्शन व देणगीदानाची सोय भक्तगणांसाठी करण्यात आली आहे. यथाशक्ती देणगी देण्यासाठी हुंडीची सोय केली आहे. यामध्ये भक्तांनी देणगी अर्पण करावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे. सोलापुरातील पद्मशालीबांधव पद्मावतीदेवीला माहेरची साडी अर्पण करण्यासाठी १९ला तिरुपतीला रवाना होणार आहेत.