शक्तीपीठ महामार्गावरून महायुतीच्या आमदारांमध्ये मतमतांतर
कोल्हापूर
शक्तिपीठ महामार्गाच्या मुद्द्यावरून महायुतीतल्या दोन नेत्यांची दोन वेगवेगळी वक्तव्य पाहायला मिळत आहेत. शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या मुद्यावरून उद्योजकांची बैठक घेतली. यावेळी शक्तिपीठ महामार्गामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासात भर पडणार असून, जे शेतकरी शक्तीपीठ महामार्गाला विरोध करत आहेत त्यांना समजावून सांगून शक्तीपीठ होईल असं राजेश क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. तर याच मुद्दयावरून हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातून हा महामार्ग जाणार नाही. याची अधिसूचना आधीच काढली आहे. लोकसभा निवडणुकीत या महामार्गामुळे फटका बसला आहे. शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध आहे. राजेश क्षीरसागर हे शहरात राहणारे आमदार आहेत. पण आम्ही ग्रामीण भागातील आहोत. ग्रामीण भागात या महामार्गाला विरोध होत आहे. असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
शिवसेना (शिंदे गटाचे) आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, साडेतीन शक्तीपीठ जोडणारा हा शक्तिपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. मुंबई- नागपूर, मुंबई-बांधा आणि बांधा ते वर्धा हा तिसरा शक्तिपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र जोडला जाणारा आहे. यामुळे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे. यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी, संस्था, औद्योगिक संस्था, शेतकरी यांना शक्तिपीठ महामार्गाचा उपयोग तसेच या लोकांमधील समज गैरसमज दुर करण्यासाठी. चर्चा करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शक्तिपीठ महामार्गामध्ये जी जमिन जाणार आहे, त्यासाठी शासन काय करणार आहे. कोणतेही नुकसान होणार नाही यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने जिल्ह्यातील विविध संस्था समर्थनाचे पत्र देणार असून त्यांच्या सर्वांची या शक्तिपीठ महामार्गाला अनुमती आहे असे सांगण्यात आले, अशी माहिती आमदार क्षीरसागर म्हणाले.
याप्रसंगी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ते शहरातले आहे. आम्ही ग्रामीण भागातील आहे. जमिनी देखील ग्रामीण भागातील आहेत. शेतकऱ्यांचा याला रोष किती आहे, हे आम्ही निवडणुकीच्यावेळी पाहिलेले आहे. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतरही मला गावात अडवलेले आहे. त्यानंतर मी दोन दिवसात मुंबईला जाऊन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून आपण ही प्रक्रिया रद्द करुन आणली आहे. त्याचवेळेला त्यांनी सांगितले की हा महामार्ग सांगली पर्यंत होणार आहे. तिथून पुढे कोल्हापूरच्या महामार्गाला जोडला जाणार आहे. तिथून पुढे संकेश्वर ते गोवा हा नवीन रस्ता झालेलाच आहे. माझ्या माहिती प्रमाणे शक्तिपीठ हे कोल्हापूर जिल्ह्यातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शक्तिपीठ महामार्गाला फार मोठा विरोध आहे. लोकशाहीमध्ये एखादा निर्णय कोणाला हवा असतो कोणाला नको असतो. पण आम्ही ग्रामीण भागातील आमदार असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार असल्याने आमचा याला तीव्र विरोध आहे. याची कल्पना राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सर्वांना आहे. याचा फटका लोकसभेच्या निडणुकीत आम्हाला काही प्रमाणात बसलेला आहे. असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.