रविवारी 28 केंद्रावर महाटीईटी परीक्षा
15 हजार 780 भावी शिक्षक देणार परीक्षा
कोल्हापूर :
पुणे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता (महाटीईटी)परीक्षा कोल्हापूरातील 28 परीक्षा केंद्रावर होणार आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवार इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षक भरतीसाठी पात्र ठरवले जाणार आहेत. पहिल्या पेपरसाठी 6 हजार 103 तर दुसऱ्या पेपरसाठी 9 हजार 677 अशी 15 हजार 780 भावी शिक्षक परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्रांवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
महाटीईटी परीक्षेमध्ये कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी प्रशासन दक्ष राहणार असून, एकूण सात झोनल अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर 28 परीक्षा केंद्रावर सहा परिरक्षकांचे बैठे पथक म्हणून कामकाज पाहणार आहेत. तसेच प्रत्येक वर्ग खोलीवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार आहे. सध्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची प्रक्रिया सुरु असून, परीक्षेच्या दिवशी परीक्षा केंद्र परिसरात कोणत्याही राजकीय पक्षास परीक्षा वेळेत राजकीय सभेस परवानगी देण्यात आलेली नाही. याकरिता परीक्षा प्रशासनाने जिल्हा पोलीस प्रशासनाला पत्र व्यवहार केला आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी दिली. परीक्षेचे नियोजन नियमानुसार शिस्तबध्द करण्यासाठी परीक्षा आयोजन समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली. या बैठकीला जिल्हा पोलीस प्रमुख यांचे प्रतिनिधी गृह पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, डाएट कोल्हापूरचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई, प्राथमिक शिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव मीना शेंडकर, माध्यमिक उप शिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, योजना उपशिक्षणाधिकारी चेतन शिंदे, प्राथमिक उपशिक्षणाधिकारी तथा जिल्हा परिरक्षक शंकर यादव, शिक्षण विस्तार अधिकारी रविंद्र ठोकळ, सरीता वाठारकर आदी उपस्थित होते. परीक्षेसाठी एक व दोन पेपर करिता एकूण 28 परीक्षा केंद्रे असून सात झोनल ऑफीसर, 28 परीक्षा केंद्र संचालक, 4 उपकेंद्रसंचालक, 28 सहाय्यक परीरक्षक, एक जिल्हा परिरक्षक, 87 पर्यवेक्षक, 423 समवेक्षक, 58 लिपिक, 116 सेवक असा सुमारे 752 लोक परीक्षेचे कामकाज पहाणार आहेत. या सर्व परीक्षा कामकाजाचे व्हिडीओ शुटींग करण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व शिक्षणाधिकारी (योजना), जि. प. कोल्हापूर यांची भरारी पथके नेमली आहेत.
परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजता हजर राहणे आवश्यक .पेपर क्रमांक 1 सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत होणार असून परीक्षाकेंद्रावर सकाळी 9 वाजता परीक्षा केंद्राच्या प्रवेशव्दारावर परीक्षार्थीची तपासणी करून, परीक्षा कक्षात प्रवेश देण्यात येईल. दुसरा पेपर दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत होणार असून, दुपारी 1.15 पासून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाईल.
या परीक्षा केंद्रांवर होणार परीक्षा
महाराष्ट्र हायस्कूल व न्यू कॉलेज, एस.एम. लोहीया हायस्कूल, विवेकांनंद कॉलेज, प्रायव्हेट हायस्कूल, छत्रपति शाहू विदयालय न्यू पॅलेस, न्यू हायस्कूल पेटाळा, न्यू मॉडेल इग्लीश स्कूल, प्रिन्सेस पदमाराजे गर्ल्स हायस्कूल, उषाराजे हायस्कूल (केंद्र क्रं. 1), उषाराजे हायस्कूल (केंद्र क्रं.2), छत्रपति राजाराम हायस्कूल क. बावडा, सेंट झेव्हियर्स हायस्कूल, शाहू कॉलेज सदर बाजार, शहाजी कॉलेज, महावीर कॉलेज, श्री. व.ज. देशमुख हायस्कूल, गोखले कॉलेज, रा.छ. शाहू महाराज हायस्कूल जुना बुधवार, शिलादेवी शिंदे हायस्कूल, एम. एल. जी. हायस्कूल, उषाराजे हायस्कूल (कमला कॉलेज), नेहरु हायस्कूल दसरा चौक, आर्यार्वन खिश्चन हायस्कूल, देशभुषण हायस्कूल, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, एस. के. पंत वालावलकर हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, दादासाहेब मगदूम हायस्कूल कोल्हापूर.