For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाशिवरात्रोत्सव : शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण! माचणूर येथील श्री.सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले

01:40 PM Mar 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
महाशिवरात्रोत्सव   शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण  माचणूर येथील श्री सिद्धेश्वर मंदिर भाविकांनी गजबजले
Advertisement

मंगळवेढा/प्रतिनिधी

मंगळवेढा तालुक्यातील माचणूरच्या भीमा नदीकाठालगतच्या कडेकपारीत हे प्राचीनकालीन भव्य हेमाडपंथी मंदिर आहे. श्रावणात येथे महिनाभर भाविकांची रेलचेल सुरू असते. तसेच महाशिवरात्रीलाही मोठ्या प्रमाणात येथे भाविक दर्शनासाठी येतात. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा इत्यादी राज्यांतून मोठ्या प्रमाणात भाविक आणि पर्यटक येथे दरवर्षी येत असतात. आज महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली आहे.

Advertisement

प्राचीन काळापासून हे मंदिर प्रसिद्ध आहे. तसेच औरंगजेबाचेही बरेच महत्त्वाचे कामकाज माचणूर येथून चालायचे. माचणूरचा किल्ला तसेच शेजारच्या बेगमपूर (घोडेश्वर) गावातला जुना किल्लाही प्रसिद्ध आहे.

येथे प्राचीनकाली ऋषिमुनी तपस्येला बसत असत.अहिल्याबाई होळकर यानी नदीकडेच्या बाजुला भव्य असा घाट बांधला. नदीच्या पात्रात जटाशंकर मंदिर आहे. तरी मंदिराच्या प्रवेशद्वाराकडे जाताना डाव्या बाजूला मल्लिकार्जुन मंदिर व उजव्या बाजूस बाबा महाराज आर्विकर यांचा मठ आहे.

Advertisement

मठाच्या लगतच औरंगजेबाचा किल्ला आहे. बादशहाने ११ रुद्राभिषेक श्रावण महिन्यामधे सुरू केले. श्रावण महिन्यामधे संपूर्ण महिनाभर ब्राम्हणाचे अधिष्ठान असते. या महिन्यामधे पूजा अर्च्यासाठी औरंगजेब कालावधीन अर्थसहाय्य मिळत आहे. औरंगजेबाने चार वर्षे या छावणीत राहुन दिल्लीचा कारभार पाहिला. या स्थळी शंकराचार्य, स्वामी समर्थ, सीताराम महाराज, बाबा महाराज आर्विकर आदी संत येथे येऊन गेले आहेत.

सिद्धेश्वर मंदिराच्या पूजेसाठी नगारा वाजवण्याचा मान माचणूर येथील मुस्लिम समाजाकडे आहे. येथील सिद्धेश्वराची पूजा अर्चा करण्याचा मान ब्रह्मपुरीतील गुरव समाजाकडे असून प्रत्येक बुधवारी आठवडा पाळी प्रमाणे बदलला जातो.

मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील श्री.सिद्धेश्वर यात्रेस आजपासून प्रारंभ होत आहे. महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या माचणूर ता.मंगळवेढा येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यात्रेला महाशिवरात्रीपासून म्हणजे आजपासून सुरवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती यात्रा समितीने दिली आहे.
यात्रेच्या पहिल्या दिवशी महाशिवरात्रीच्या पहाटे चार वाजता प्रांताधिकारी बी. आर. माळी, तहसीलदार मदन जाधव व उद्योजक संजय आवताडे यांच्या हस्ते 'श्री'ची महापूजा करण्यात आली आहे. सकाळी आठ ते दुपारी चारपर्यंत सिद्धेश्वर अन्नछत्र मंडळ व ग्रामस्थांतर्फे महाप्रसादाचे वाटप चालू आहे. सायंकाळी सात वाजता 'श्रीं'च्या पालखीचे गावातून मंदिराकडे आगमन व नयनरम्य आतषबाजी होणार आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजता पारंपरिक भेदिक गाणी-कलगीतुरा कार्यक्रमाचे उ‌द्घाटन दामाजी शुगरचे अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तसेच या फडात पुणे, कोल्हापूर, धाराशिव, नाशिक, नगर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांतून नामांकित शाहीर आपली कला सादर करणार आहेत.

रविवारी दुपारी दोन वाजता जंगी कुस्ती स्पर्धेचे उ‌द्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते होणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार प्रशांत परिचारक व प्रमुख पाहुणे आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहेत, या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्या मल्लास बुलेट मोटारसायकल, सिद्धेश्वर केसरी चषक व मानाची गदा बक्षीस प्रदान करण्यात येईल.

Advertisement
Tags :

.