शहर परिसरात महाशिवरात्री भक्तिभावाने
शहरातील शिवमंदिरे गर्दीने फुलली : पहाटेपासून रुद्राभिषेक, पूजा, शिवनाम स्मरण, शिवभजन, पारायण, कीर्तनाचा कार्यक्रम
बेळगाव : ‘शिवोहम, शिवोहम’, ‘ओम नम:शिवाय’, नागेंद्रहाराये, अशा शिवाची स्तुती करणाऱ्या गीतांचा व मंत्रांचा जयघोष करत शहर परिसरात महाशिवरात्री अत्यंत भक्तिभावाने साजरी झाली. या निमित्ताने शहरातील सर्व शिवमंदिरे गर्दीने फुलून गेली. कपिलेश्वर मंदिरातील गर्दीने यंदा आजपर्यंतच्या गर्दीच्या उच्चांकाचा विक्रम मोडला. महात्मा फुले रोडपासून मंदिरापर्यंत शिवदर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. महाशिवरात्रीच्या निमित्ताने पहाटेपासून रुद्राभिषेक, पूजा, शिवनाम स्मरण, शिवभजन, पारायण, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम झाले. शिवाय सकाळपासूनच शिवमंदिरांतून दर्शनासाठी भक्तांची वर्दळ वाढली होती.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर मंदिर
कपिलेश्वर मंदिरात मंगळवारी रात्री रुद्राभिषेक करून महाशिवरात्री उत्सवाला प्रारंभ झाला. बुधवारी पहाटे अभिषेक करण्यात आला. यावेळी त्रिकाल पूजेचेही आयोजन करण्यात आले होते. त्याबरोबरच राजगीरा लाडूचे वितरण भक्तांना करण्यात आले. सायंकाळी पालखी प्रदक्षिणा करण्यात आली. गुरुवार दि. 27 रोजी 12 ते 4 या वेळेत महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे. भक्तांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
विजयनगर, शिवगिरी कॉलनी, शिवमंदिर
विजयनगर पाईपलाईन रोड, शिवगिरी कॉलनी येथील शिवमंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. बुधवारी पहाटे महारुद्राभिषेक व रात्री नामस्मरण, भजन व पूजा झाली. यावेळी भक्तांनी सकाळपासून दर्शनासाठी गर्दी केली होती.
शहापूर स्मशानभूमीत महाशिवरात्र
सालाबादप्रमाणे शहापूर येथील मुक्तिधाम सेवा सुधारणा मंडळाच्यावतीने मुक्तिधाम स्मशानभूमीत महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. 26 वर्षांपासून येथे महाशिवरात्र सोहळा आयोजित केला जातो. महाशिवरात्रीनिमित्त मध्यरात्री आणि पहाटे अभिषेक, पूजा, महाआरती आदी कार्यक्रम पार पडले. त्यानंतर सकाळपासून प्रसाद वाटप तसेच उपवासाचा फराळ वाटप करण्यात आला. भारतनगर शहापूर येथील श्रीमाता भक्ती महिला भजनी मंडळाच्या भजनाचा कार्यक्रम झाला. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसराला आकर्षक रोषणाई तसेच फुलांची आरास करण्यात आली.
रामलिंग देवस्थान, अनगोळ
मारुती गल्ली, रामलिंग देवस्थान अनगोळ येथे महाशिवरात्रीनिमित्त मंगळवारी रात्री दुग्धाभिषेक व पूजा झाली. या निमित्ताने गाभाऱ्यात फुलांची आरास करण्यात आली होती. बुधवारी पहाटे महापूजा झाल्यानंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. या तीर्थप्रसादाचा भक्तांनी लाभ घेतला.
कलमेश्वर मंदिर, अनगोळ
अनगोळ येथील ग्रामदैवत श्री कलमेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली. पहाटे शिवलिंगाची पूजा करून अभिषेक करण्यात आला. त्यानंतर देवाची आरती करण्यात आली. शिवपिंडीवर फळा-फुलांची आरास करण्यात आली होती. सकाळपासून दर्शनासाठी भाविकांची वर्दळ होती. सायंकाळी पूजा आणि महाआरती करण्यात आली. या निमित्ताने मंदिरावर विद्युत रोषणाई केली होती.
महर्षि रोड टिळकवाडी
महर्षि रोड, टिळकवाडी येथील शिवलिंग मंदिरात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. बुधवारी सकाळी 7 वाजता नित्यपूजा आणि अभिषेक करण्यात आला. दुपारी 12 वाजता आरती झाली. रात्री महाआरती व मंत्रपुष्प झाले. गुरुवारी सकाळी 7 वाजता नित्यपूजा, वरदशंकर पूजा व दुपारी 12 वाजता महाप्रसादाचे वितरण केले जाणार आहे.
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थान
नार्वेकर गल्ली येथील ज्योतिर्लिंग देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रयागराज येथून गंगा, यमुना, सरस्वती त्रिवेणी संगम, गोदावरी, अयोध्या, काशी येथून आणलेले तिर्थाचे गंगापूजन करण्यात आले. तसेच जोतिबा देवाला व महाकालेश्वरला जलाभिषेक घालण्यात आला. तसेच ब्रह्म मुहुर्तावर लघुरुद्राभिषेक करून मंदिरात महाकालेश्वरची आकर्षक प्रतिकृती साकारण्यात आली. भक्तांना तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाकालेश्वरची प्रतिकृती भक्तांना दर्शनासाठी खुली करण्यात आली असून याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दादा महाराज अष्टेकर भक्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.
पंचवटी देवस्थान, गोवावेस
गोवावेस येथील पंचवटी देवस्थानात महाशिवरात्री उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी रुद्राभिषेक, महामृत्युंजय होम करण्यात आला. त्याबरोबरच फळा-फुलांची आरास करून महाआरती करण्यात आली. यावेळी टिळकवाडी, हिंदवाडी येथील भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.
यंदा महाशिवरात्रीच्या निमित्ताने बहुसंख्य राजकीय व्यक्तींनी उपस्थित राहून अभिषेक व पूजा केली. तसेच पोलीस दलातील बहुसंख्य अधिकाऱ्यांनीसुद्धा मंदिरात येऊन शिवदर्शन घेतले. यंदा उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मंदिरातर्फे मंदिरापासून काही अंतरापर्यंत कापडाचे आच्छादन घालून सावली करण्यात आली होती. दरवर्षीपेक्षा दुप्पट झालेली गर्दी नियंत्रित करताना कार्यकर्त्यांचीही दमछाक झाली.