राजशेखर तळवार यांना महर्षि वाल्मिकी पुरस्कार जाहीर
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील पाच महसूल विभागातून प्रत्येकी एकाची 2024 सालातील श्री महर्षि वाल्मिकी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यात बेळगावच्या गांधीनगर येथील राजशेखर तळवार यांचाही समावेश आहे. बेळगाव विभागातून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. बेंगळूरमध्ये होणाऱ्या वाल्मिकी जयंती कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. 20 ग्रॅम सुवर्णपदक आणि 5 लाख रु. रोख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
राजशेखर तळवार हे आदिवासी समुदायातील जनतेत शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छतेविषयी जागृती करत आहे. आदिवासी समुदायाच्या समस्या विविध खात्यांच्या निदर्शनास आणून पायाभूत सुविधा व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी परिश्रम घेतले आहेत. डोंगराळ भागातील आदिवासी समुदायामध्ये शिक्षणाविषयी जागृती निर्माण करणे शिक्षणासंबंधी शिबिरांचे आयोजन, सरकारी मदत मिळावी आणि या समुदायातील विद्यार्थ्यांचे पुढील शिक्षण सुरु राहावे याकरिता ते प्रयत्नशील आहेत. त्यांना आदिवासींच्या उन्नतीसाठी केलेल्या सामाजिक सेवेची दखल घेत राज्य सरकारने या पुरस्कारासाठी निवड केली आहे.
2024 या सालातील महर्षि वाल्मिकी पुरस्कारासाठी निवड करण्यासाठी के. एच. मल्लेशप्पा, जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्त्वाखाली निवड समिती नेमण्यात आली होती. या समितीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पाच साधकांची शिफारस राज्य सरकारकडे केली होती.