हिंदुस्थान एरोनॉटिक्सला ‘महारत्न’ दर्जा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
हवाई व संरक्षण क्षेत्रातील सर्वात जुनी आणि दिग्गज कंपनी हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमीटेड यांना ‘महारत्न’ हा दर्जा प्राप्त झाला आहे. या बातमीनंतर कंपनीचा समभाग सोमवारी इंट्रा डे दरम्यान 2 टक्के इतका वाढला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हिंदुस्थान एरोनॉटिक्सला ‘महारत्न’ दर्जा देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. या बातमीमुळे सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कंपनीचे समभाग चांगलेच चमकताना दिसले. इंट्रा डे दरम्यान शेअर बाजारात हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे समभाग 2 टक्के वाढत 4544 रुपयांवर पोहोचले होते.
गेल्या पाच सत्रामध्ये बाजारात कंपनीचा समभाग 7 टक्के इतका वाढलेला आहे. अशा प्रकारे ‘महारत्न’ दर्जा मिळविणारी हिंदुस्थान एरोनॉटिक्स ही कंपनी 14 वी सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी ठरली आहे.
निर्णयाचा परिणाम
या निर्णयामुळे कंपनीला आगामी काळामध्ये आपल्या आर्थिक धोरणांमध्ये सुधारणा करणे त्याचप्रमाणे अतिरिक्त गरजांची पूर्तता करणे अधिक सोयीस्कर होणार आहे. यापूर्वी कंपनीला कोणत्याही संदर्भात निर्णय घेताना सरकारची पूर्वपरवानगी घ्यावी लागत असे. आता यातून कंपनीची एका अर्थाने सुटका होणार आहे. 28162 कोटीची कंपनीची वार्षिक उलाढाल असून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 7595 कोटी रुपये निव्वळ नफा कंपनीने कमावलेला आहे.