'महाविकास'मधून बाहेर पडणार नाही...पण त्यांनी आपापसातील वाद मिटवावा- प्रकाश आंबेडकर
वंचित बहुजन आघाडीचे (VBA) प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या (MVA) बैठकांना उपस्थित न राहण्याच्या सूचना दिल्यानंतर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याच्या चर्चाही खोडून काढल्या आहेत. तसेच शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस या महाविकास आघाडीच्या घटकांनी आपापले मतभेद लवकरात लवकर सोडवावीत असे म्हटले आहे.
महाविकास आघाडीमधील जागावाटपासंबंधात वंचित बहूजन आघाडी समाधानी नसल्याचं वारंवार समोर येत असतानाच काल पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीच्या कोणत्याही कार्यक्रमाला किंवा बैठकिला हजर न राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, वंचित बहूजन आघाडी महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याच्या मानसिकतेमध्ये आहे काय या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, “नाही, आम्ही MVA मधून बाहेर पडणार नाही आहोत. आम्ही महाविकास आघाडीबरोबर आहोत पण तरीही MVA चा अविभाज्य भाग नाही. त्यांनी अद्यापही आपापसात जागावाटपाचा निर्णय घेतलेला नाही. आणि म्हणूनच आम्ही अजूनही पिक्चरमध्ये नाही,” असेही ते म्हणाले.
वंचितच्या अधिक जागा मागितल्याने महाविकास आघाडीला स्थान दिले आहे का, असे विचारले असता आंबेडकर म्हणाले, "आम्ही अद्याप कोणत्याही जागांसाठी मागणी केलेली नाही. आमच्या पक्षाचे नेते काही जागांची मागणी करत असताना मी अकोल्यातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही मागणी अद्याप महाविकास आघाडीसमोर ठेवली गेली नाही, ”असेही ते म्हणाले आहेत.