कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खेलो इंडियात महाराष्ट्राची विजेतेपदाची हॅटट्रिक

06:10 AM May 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य पदकांसह 158 पदकांची लयलूट : हरियाणाला दुसरे तर राजस्थानला तिसरे स्थान

Advertisement

वृत्तसस्था/पटना

Advertisement

गतविजेत्या महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत खेलो इंडिया युवा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपदाच्या हॅट्ट्रिकचा पराक्रम केला. 58 सुवर्ण, 47 रौप्य, 53 कांस्य अशी एकूण 158 पदकांची लयलूट करीत  महाराष्ट्राने अव्वल स्थानाचे शिखर सर केले. तब्बल 9 स्पर्धा विक्रमांचा पराक्रमही महाराष्ट्राने यंदाच्या 7व्या खेलो इंडिया स्पर्धेत केला आहे. पाटलीपुत्र क्रीडा संकुलातील समारोप समारंभात बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी व केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खेडसे यांच्या हस्ते महाराष्ट्राला विजेतेपदकाचा करंडक देऊन गौरविण्यात आले. पथकप्रमुख महादेव कसगावडे, सहाय्यक संचालक भाग्यश्री बीले, क्रीडाधिकारी अरूण पाटील, शिवाजी कोळीसह मराठमोळ्या खेळाडूंनी विजेतेपदाचा करंडक स्वीकारला. करंडक स्वीकारल्यानंतर महाराष्ट्राच्या जयघोषाने परिसर दुमदुमला.

मध्यप्रदेश, तामिळनाडू पाठोपाठ बिहारमध्येही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सर्वाधिक पदकांचे शिखर पूर्ण करीत विजेतेपद पटकाविले. महाराष्ट्राच्या पदक विजेत्या खेळाडूंचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांनी अभिनंदन केले. गत तामिळनाडू स्पर्धेत 57 सुवर्ण, 48 रौप्य व 53 कांस्य अशी एकूण 158 पदके मिळवून महाराष्ट्राने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व गाजविले होते. मध्यप्रदेश पाठोपाठ तामिळनाडूत सर्वसाधारण विजेतेपदावर आपले नाव कोरले होते.

बिहार स्पर्धेत महाराष्ट्राने 9 स्पर्धा विक्रमाची नोंद केली. वेटलिफ्टिंग अस्मिता ढोणेने 2, साईराज परदेशीने 3, अॅथलेटिक्समध्ये सैफ चाफेकर, रोहित बिन्नार, आदित्य पिसाळ व रिले संघाने प्रत्येकी 1 असे एकूण 9 स्पर्धा विक्रम प्रथमच खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या नावापुढे झळकले आहेत. अपेक्षेप्रमाणे सर्वोत्तम कामगिरी करीत 7 व्या खेलो इंडिया युवा स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखले. हरियाणाने 39 सुवर्ण, 27 रौप्य, 51 कांस्य पदकांसह एकूण 117 पदके जिंकून दुसरे स्थान प्राप्त केले. राजस्थान 24 सुवर्ण, 12 रौप्य, 24 कांस्य एकूण 60 पदकांसह तिसऱ्या स्थानावर राहिला.

स्पर्धेतील 27 पैकी 22 क्रीडाप्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी पदकांचा करिश्मा घडविला. अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक 10 सुवर्णपदकांना गवसणी घातली, तर जलतरणात 7 सुवर्णासह एकूण 29 पदके कमविली. जिम्नॅस्टिक्समध्ये 6, आर्चरीत 6, वेटलिफ्टिंगमध्ये 5 सुवर्णपदके महाराष्ट्राने पटकावली. कुस्ती, सायकलिंग, नेमबाजीत महाराष्ट्राने सुवर्ण चौकार झळकविला. सॅपकटकरॉव, गटका, रग्बी या खेळातही महाराष्ट्र चमकला. स्पर्धत 437 खेळाडूंसह 128 प्रशिक्षक, व्यवस्थापक असे एकूण 565 जणांचे पथक सहभागी झाले होते.

महाराष्ट्राची तलवार तळपली! मुलांना दुसरे सर्वसाधारण विजेतेपद

बिहारमध्ये पार पडलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत तलवारबाजीमध्ये महाराष्ट्रीय खेळाडूंच्या तलवारी चांगल्याच तळपल्या. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने दुसरे सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दोन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण 6 पदके जिंकली. मुलांच्या विभागात महाराष्ट्र संघाला तलवारबाजी इपी सांघिक प्रकारात सुवर्णपदक, तर फॉईल सांघिक प्रकारात कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या मुलांनी इप्पी सांघिकमध्ये पंजाब, मणिपूर, हरियाणा संघाचा पराभव करत सुवर्णपदक नाव कोरले. अटीतटीच्या अंतिम लढतीत महाराष्ट्राने हरयाणाचा 45-43 गुण फरकाने पाडाव केला. फॉईल मुलांच्या संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तर प्रदेशचा  43-23 पराभव करून एकतर्फी विजय मिळवून उपांत्य फेरीत गाठली. मात्र, उपांत्य लढतीत मणिपूरकडून 45-40 च्या फरकाने निसटता पराभव झाल्यामुळे महाराष्ट्रला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

मुलींच्या विभागात एक रौप्य अन् कांस्य

मुलींच्या विभागात इपी सांघिकमध्ये महाराष्ट्र संघाला रौप्यपदक मिळाले. जान्हवी जाधव, प्राजक्ता पवार, सियारा पुरंदरे, मिताली परदेशी या चौकडीने हे रूपेरी यश मिळविले. उत्तराखंडला हरवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली. मग कर्नाटकला हरवून अंतिम फेरीत धडक दिली. मात्र, हरियाणाने अंतिम फेरीत महाराष्ट्राला 42-39 असे हरवून सुवर्णपदक जिंकले. पंजाबचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने उपांत्य फेरी गाठली होती. मात्र, उपांत्य फेरीत हरयाणाकडून 20-45 फरकाने पराभूत झाल्याने महाराष्ट्राला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article