महाराष्ट्राची दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक!
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : दोन्ही गटांत ओडिशावर विजय
क्रीडा प्रतिनिधी, / फोंडा
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी ओडिशाच्या दोन्ही संघांना दणका देत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच दुहेरी सुवर्णपदकांची हॅटट्रिक साकारली. महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच मोठे विजय साजरे करत सुवर्णपदकाचे दावेदार असल्याचे दाखवून दिले होते. यापूर्वी केरळ येथे झालेल्या 2015 च्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत व त्यानंतर झालेल्या 2022 च्या गुजरात स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी सुवर्णपदक मिळवले होते व आता गोवा येथे हॅटट्रिक साजरी केली.
पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशाचा 72-26 (मध्यंतर 36-12) असा धुव्वा उडवला. सामन्यात सुरवातीपासूनच महाराष्ट्राने वर्चग्स्व राखले होते. सुयश गरगटेने 2 मि. संरक्षण करून 6 गुण मिळवले, फैझांखा पठाणने 2 मि. संरक्षण करून 8 गुण मिळवले, वृषभ वाघने 2 मि. संरक्षण केले. तर कर्णधाराची खेळी करताना रामजी कश्यपने 1 मि. संरक्षण करून तब्बल 12 गुण वसूल केले. तर आदित्य गणपुलेने 1:50 मि. संरक्षण करून 4 गुण मिळवले व मोठा विजय निश्चित केला. तर पराभूत ओडिशाच्या विशाल ओरामने 1.30 मि. संरक्षण करून 4 गुण मिळवले तर अर्जुन सिंघने 1 मि. संरक्षण करून 6 गुण मिळवत दिलेली लढत अपुरी ठरली.
महिलांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने ओडिशावर 46-40 असा दणदणीत विजय साजरा केला. महाराष्ट्राच्या प्रियंका इंगळेने 2.10, 1.30 मि. संरक्षण करत 8 गुणांची कमाई केली, प्रियांका भोपीने 1.22, 1.50 मि. संरक्षण करत 4 गुण मिळवले. काजल भोरने आक्रमणात 8 गुण वसूल केले, गौरी शिंदेने 1.28 मि. संरक्षण करत 2 गुण मिळवले. तर पराभूत ओडिशाच्या माधुमिताने 1.36 मि. संरक्षण करत तब्बल 10 गुण वसूल केले तर रंजिताने 1.08 मि संरक्षण करत 4 गुण मिळवत जोरदार लढत दिली. मात्र महाराष्ट्राने त्याची डाळ शिजू दिली नाही. पुरुषामध्ये केरळ व आंध्र प्रदेश तर महिलांमध्ये कर्नाटक व केरळ तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
योगिता खाडे, शिवराज वरघाडे यांना सुवर्ण
महाराष्ट्राने स्क्वे मार्शल आर्ट् क्रीडा प्रकारात बुधवारी सात पदकांची लयलूट केली. यात योगिता खाडे आणि शिवराज वरघाडे यांच्या सुवर्णपदकांचा समावेश आहे.
महिलांच्या 70 किलो वजनी गटात योगिताने बाजी मारली. या गटात गोव्याच्या मिताली तामसेने रौप्य तसेच सरला कुमारी (राजस्थान) आणि निकिता कौर (दिल्ली) कांस्यपदकांच्या मानकरी ठरल्या. पुरुषांच्या 74 किलो वजनी गटात शिवराज अव्वल ठरला. या गटात गोव्याच्या मंजू मालगावीने रौप्यपदक, तर अभिषेक गंभीर (दिल्ली) आणि हर्षवर्धन एलएस (कर्नाटक) यांना कांस्यपदक मिळाले. महाराष्ट्राच्या आस्था गायकीने 46 किलो वजनी गटात आणि आणि वैशाली बांगरने 70 किलोंवरील वजनी गटात रौप्य पदके पटकावली. याचप्रमाणे महाराष्ट्राच्या हुजैफा ठाकूर (54 किलो), वेदांत सुर्वे (62 किलो) आणि अश्विनी वागज् (66 किलो) यांनी कांस्यपदके मिळवली.