तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघाला रौप्य
रोइं&गमध्ये मृण्मयीला रौप्य : नेमबाजीत आज स्वप्नील कुसाळेकडून पदकाची अपेक्षा : राही सरनोबतकडून मात्र निराशा
वृत्तसंस्था/ डेहराडून
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तिरंदाजी क्रीडा प्रकारातील कंपाउंड राउंड महिलामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लावणाऱ्या अंतिम लढतीत महाराष्ट्राच्या अदिती स्वामी, मधुरा धामणगावकर, प्रितिका प्रदीप यांच्या संघास रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रतिस्पर्धी पंजाब संघाने अवघ्या एका गुणाच्या फरकाने बाजी मारत सुवर्णपदकावर नाव कोरले.
डेहराडून येथील मुख्य क्रिकेट स्टेडियममध्ये महाराष्ट्रविरुद्ध पंजाब हा अंतिम सामना अतिशय रंगतदार झाला. हवेच्या वेगात सुवर्णपदकासाठी दोन्ही संघातील तुल्यबळ धनुर्धारी भिडले होते. धनुर्धारींनी मारलेला बाणाचा प्रत्येक वेध आणि त्यास मिळणारा प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे सुवर्णपदकाची लढत डोळ्याची पारणे फेडणारी ठरली. अदिती स्वामी (सातारा), मधुरा धामणगावकर व प्रितिका प्रदीप (पिंपरी चिंचवड) या महिला संघाने सुवर्णपदकासाठी सर्वस्व पणाला लावले. मात्र, दोन वेळा मिळालेले 8 गुण महाराष्ट्राला महागात पडले अन् त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. त्याआधी, महाराष्ट्राच्या या महिला संघाने उपांत्यपूर्व सामन्यात उत्तराखंड संघावर 233-214 गुणांनी, तर उपांत्य सामन्यात तेलंगणा संघावर 229-228 गुणांनी मात करत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामना पंजाब संघाने 229-228 गुण फरकाने म्हणजेच एका गुणाने बाजी मारत सुवर्णपदक पटकावले. कंपाउंड महिला संघाचे संघ मार्गदर्शक म्हणून प्रवीण सावंत यांनी यावेळी काम पाहिले.
खरं तर आम्ही जोरदार लढत दिली. अवघ्या एका गुणाने हरलो म्हणजे आज नशीब आमच्या बाजूने नव्हते असेच म्हणावे लागेल. पंजाबच्या महिलांनीही चांगला खेळ केला. त्यामुळे त्यादेखील सुवर्ण पदकाच्या हक्कदार होत्या.
आदिती गोस्वामी, महाराष्ट्र
रोईंगमध्ये महाराष्ट्राच्या मृण्मयीला रौप्य
महाराष्ट्राच्या मृण्मयी साळगावकरने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक तर गुरप्रताप सिंग याने कांस्यपदक जिंकून रोईंग स्पर्धेतील सलामीच्या दिवशी शानदार कामगिरी केली.
नाशिकच्या मृण्मयी हिने सिंगल स्कल प्रकारातील दोन किलोमीटर अंतराच्या शर्यतीत रुपेरी कामगिरी केली. तिला हे अंतर पार करण्यास 8 मिनिटे 47.6 सेकंद वेळ लागला. मध्यप्रदेशच्या खुशप्रीत कौर हिने हे अंतर 8 मिनिटे 40.3 सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. मृण्मयी हिने 2022 मध्ये झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकले होते, तर 2023 मध्ये तिने राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले होते. तिने आशियाई क्रीडा स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या स्पर्धेमध्ये पदक जिंकण्याबाबत मला खात्री होती. त्या दृष्टीनेच मी नियोजन केले होते. येथील पदक मला भावी कारकीर्दीसाठी निश्चितच उपयोगी पडणार आहे, असे मृण्मयी हिने सांगितले.
पुरुषांच्या सिंगल स्कल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा आर्मी रोईंग सेंटरचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने दोन किलोमीटरचे अंतर 8 मिनिटे 4 सेकंदात पार केले. सेनादलाचा बलराज पन्वर (7 मिनिटे 26.6 सेकंद) व उत्तराखंडचा नवदीप सिंग (7 मिनिटे 41.10 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले. पुण्याचा खेळाडू गुरप्रताप सिंग याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याने यापूर्वी सेनादलाकडून भाग घेताना अखिल भारतीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी केली आहे.

स्वप्नील कुसाळे आज पदकावर नेम साधणार
ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील नेमबाजीच्या 50 मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये अपेक्षेप्रमाणे अंतिम फेरी गाठली. आज (गुरुवारी) सकाळी 10 वाजता अंतिम फेरीचा थरार रंगणार आहे. महाराणा प्रताप क्रीडा संकुलातील त्रिशूल शूटिंग रेंजवर सुरू असलेल्या या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वप्नील कुसळेने एकूण 588 गुणांची कमाई करीत पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरी गाठली. त्याने नीलिंग (गुडघ्यावर बसून) पोझिशनमध्ये 195, प्रोन (झोपून) पोझिशनमध्ये 200, तर स्टॅडींग (उभे राहून) पोझिशनमध्ये 193 अशी एकूण 588 गुणांची कमाई करीत अंतिम फेरीची पात्रता मिळविली. पात्रता फेरीत मध्यप्रदेशच्या प्रताप सिंग तोमरने 598 गुणांसह अव्वल स्थान मिळविले. चैन सिंग (594), नीरज कुमार (591) व निशान बुधा (589) या सेनादलाच्या नेमबाजांनी अनुक्रमे दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासह अंतिम फेरीचे तिकीट बुक केले.
राहीकडून निराशा
आशियाई स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती व दोन वेळची ऑलिंपियन नेमबाज असलेल्या राही सरनोबतकडून महाराष्ट्राला पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र, महिलांच्या 10 मिटर एअर पिस्तूल प्रकारात ही कोल्हापूरची सुकन्या चौथ्या स्थानावर राहिल्याने चाहत्यांची निराशा झाली.
सायकलिंगमध्ये महाराष्ट्राचा दुहेरी धमाका!
महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सायकलिंगमधील पदकांची मालिका कायम राखताना आज महिला गटात एक रौप्य आणि एक कांस्यपदक जिंकले. महिलांच्या चार किलोमीटर अंतराच्या सांघिक कौशल्य स्पर्धेत महाराष्ट्राला कांस्यपदक मिळाले. या संघात वैष्णवी गाभणे संस्कृती खेसे, सिया ललवाणी व पूजा दानोळे यांचा समावेश होता. महाराष्ट्राने ही शर्यत पाच मिनिटे 32.643 सेकंदात पार केली. हरियाणा (पाच मिनिटे 26.920 सेकंद) व ओडिशा (पाच मिनिटे 30.423 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक जिंकले. महाराष्ट्राच्या श्वेता गुंजाळ हिने पाच फेऱ्यांचा समावेश असलेल्या ‘केरीन‘ सायकलिंग या प्रकारात रौप्य पटकाविले.