For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक रौप्य

06:26 AM Feb 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
जिम्नॅस्टिक्समध्ये  महाराष्ट्राला दोन सुवर्ण  एक रौप्य
Advertisement

उत्तराखंड : किमयाला एक सुवर्ण एक रौप्य, तर परिणाला सुवर्ण :  मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये डबल धमाका

Advertisement

वृत्तसंस्था/ डेहराडून

जिम्नॉस्टिक्समध्ये किमया कार्ले आणि परिणा मदनपोत्रा या महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत 16 व्या दिवशी सकाळच्या सत्रात दोन सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकून धडाकेबाज सुरुवात केली. भागीरथी संकुलात सुरू असलेल्या रिदमिक्स स्पर्धेतील बॉल प्रकारात ठाण्याच्या किमया कार्ले हिने बाहुलीच्या कॅरेक्टरचे अफलातून सादरीकरण केले. जिवंत बाहुलीच्या रूपात बॉलवर वैविध्यपूर्ण प्रात्यक्षिके सादर करून पंचासह उपस्थित क्रीडाप्रेमींची वाहवाह मिळवीत किमयाने सर्वाधिक 25.95 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर मोहर उमटवली. मुस्काना राणा (25.75 गुण) व मान्या शर्मा (25.95 गुण) या जम्मू-काश्मीरच्या खेळाडूंनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदकाची कमाई केली.Maharashtra wins six medals on the last day of swimming

Advertisement

रिदमिक्सच्या हुप प्रकारात ठाण्याच्या परिणा मदनपोत्रा हिने तोबा तोबा.. आणि लैला मैं लैला.. या बॉलिवूड गाण्यावर मंत्रमुग्ध करणाऱ्या अतिशय कलात्मक व अफलातून रचना सादर करून 24.45 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकावर महाराष्ट्राचे नाव कोरले. याच प्रकारात महाराष्ट्राच्या किमयाने क्रुवेला या कॅरेक्टरवर एटीट्यूड आणि खुन्नस या थीमवर सुरेख रचना सादर करुन 24.15 गुणांसह रुपेरी यश मिळविले. हरियाणाची लाइफ अदलखा 24.05 गुणांसह कांस्य पदकाची मानकरी ठरली. किमया कार्ले ही मानसी गावंडे व पूजा सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते, तर परिणा मदनपोत्रा हिला वर्षा उपाध्ये यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

   मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये डबल धमाका, मयांकला सुवर्ण, सौरभला कांस्य

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये महाराष्ट्राने सलग तिसऱ्या दिवशीही सुवर्णयशाची धडाकेबाज कामगिरी केली. टेट्रार्थलॉनच्या वैयक्तिक प्रकारात मयांक चाफेकरने सुवर्णपदकाची बाजी मारली. पाठोपाठ सांघिक गटातही महाराष्ट्राने  अव्वलस्थान पटकावले. वैयक्तिक प्रकारातील कांस्यपदकही महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने जिंकले. गौलापार येथे सुरू असलेल्या मॉडर्न पेंटॅथलॉनमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही महाराष्ट्राचा जयजयकार दुमदुमला. टेट्रार्थलॉन प्रकारात ठाणेच्या मयांक चाफेकरने 1126 गुणांची कमाई करीत सुवर्णपदकावर नाव कोरले. हरियाणाच्या बसंत तोमरने 1076 गुणांसह रौप्यपदक तर जिंकले तर महाराष्ट्राच्या सौरभ पाटीलने 1065 गुणांची कमाई करीत कांस्यपदकही जिंकले. 200 मीटर जलतरण, तलवारबाजी, 1600 मीटर धावणे, लेझर नेमबाजी व 600 मीटर धावणे असा हा दमछाक व कौशल्यपूर्ण प्रकारात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दुसऱ्यांदा सुवर्णपदक पटकवले. गोवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतही महाराष्ट्राने पदकाची लयलूट केली होती.

टेट्रार्थलॉन सांघिक प्रकारातही महाराष्टाचा संघ अव्वल राहिला. मराठामोळे क्रीडापटू मयांक चाफेकर, सौरभ पाटील व पुण्याचा जय लवटे त्रिमूर्तींनी 3179 गुणांची कमाई करीत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. रौप्यपदक गोवा तर कांस्य पदक हरियाणा संघाला मिळाले.

 अॅथलेटिक्समध्ये संजीवनी जाधवला रौप्यपदक 

नाशिकची संजीवनी जाधव हिने महिलांच्या 5 हजार मिटर शर्यतीत रौप्य, तर पूनम सोनूने हिने कांस्यपदक जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये आजचा दिवस गाजवला. याचबरोबर महिलांच्या 400 मिटर अडथळा शर्यतीत नेहा ढाबरे हिने कांस्यपदकाची कमाई केली, तर पुरुषांच्या 400 मिटर शर्यतीत बिद्री (कोल्हापूर) येथील रोहन कांबळे यालाही कांस्यपदक मिळाले.

गंगा अॅथलेटिक्स स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे. संजीवनी जाधवकडून आज महाराष्ट्राला सुवर्णपदकाची अपेक्षा होती. पहिल्या फेरीपासून तिने आघाडीही घेतली होती. यजमान उत्तराखंडची अंकिता आणि संजीवनी यांच्यात पहिल्या फेरीपासून पाठशिवणीचा खेळ रंगला होता. संजीवनी सुवर्ण पदकाला गवसणी घालणार असे वाटत असताना अखेरच्या 300 मीटरमध्ये अंकिताने मुसंडी मारत संजीवनीला मागे टाकले. अखेरच्या टप्प्यासाठी राखून ठेवलेल्या दमचा वापर करीत अंकिताने 15 मिनिटे 56.03 सेकंद वेळेसह सुवर्ण पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या संजीवनीला  15 मिनिटे 59.13 सेकंद वेळेसह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महाराष्ट्राच्या पूनम सोनूने हिने 16 मिनिटे 53.52 सेकंद वेळ नोंदवित कांस्यपदक जिंकले.

किरण मात्रेकडून निराशा

पुरुषांच्या 5 हजार मिटर शर्यतीत महाराष्ट्राच्या किरण मात्रे याने निराशा केली. दोन फेऱ्यापर्यंत आघाडीवर असलेला किरण नंतर प्रत्येक फेरीनंतर मागे पडत गेला. सहाव्या फेरीत सहाव्या स्थानापर्यंत घसरलेल्या किरणने पोटात दुखायला लागल्यामुळे अर्ध्यावरच शर्यत सोडल्याने महाराष्ट्राची पदकाची आशा संपुष्टात आली.

अडथळा शर्यतीत नेहाला कांस्य, तर रोहनला लॉटरी

महिलांच्या 400 मिटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या नेहा ढाबळे हिने 1 मिनिट 52 सेकंद वेळेसह कांस्यपदक जिंकले. विथया रामराज व श्रीवर्थनी एस के या तमिळनाडूच्या धावपटूंनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाला गवसणी घातली. मात्र, पुरुषांच्या याच शर्यतीत महाराष्ट्राच्या किरण मात्रेला कांस्यपदकाची लॉटरी लागली. कारण सेनादलाचा निखिल भारद्वाज याने तिसरा क्रमांक मिळविला होता. मात्र, त्याला अपात्र ठरविण्यात आल्याने महाराष्ट्राच्या झोळीत अनपेक्षितपणे कांस्यपदक पडले.

 महिलांच्या गटात महाराष्ट्राला सांघिक रौप्य

जिम्नॉस्टिक्स पाठोपाठ मराठमोळ्या मल्लखांबतही महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवले आहे. दोरीचा मल्लखांब प्रकारात जान्हवी जाधवने सुवर्ण, तर रूपाली गंगावणेने रूपेरी यशाला गवसणी घातली. मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने रौप्य पदकाची कमाई करीत आजचा दिवस गाजविला. वन चेतना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या मल्लखांब स्पर्धेत पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा बोलबोला सुरू आहे.

दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबई उपनगरच्या जान्हवी जाधवने आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करून सुवर्ण यशाची भरारी घेतली. विश्वकरंडक चॅम्पीयन असणाऱ्या जान्हवीने कलात्मक प्रदर्शन करीत अवघड रचना सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. 8.65 गुणांची कमाई करीत सलग तिसऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जान्हवीने आपल्या यशाचा झेंडा फडकविला. दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबईच्या खेळाडूंचा डंका वाजला. स्पर्धेत वयाने सर्वात मोठी असणारी 27 वर्षीय रूपाली गंगावणेने रूपेरी यश संपादले. चेंबुरमधील टमलिंग अॅकॅडमीत 8 तास सराव करणार्या रूपालीने 8.45 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा पदकाची हॅटट्रिक केली. याशिवाय, महिलांच्या सांघिक प्रकारात जान्हवी जाधव, नेहा क्षीरसागर, निधी राणे, पल्लवी शिंदे, प्रणाली मोरे व रूपाली गंगावणे यांनी 82.85 गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. 83.20 गुण संपादून मध्य प्रदेश संघाने सुवर्णपदक जिंकले आहे.

Advertisement
Tags :

.