For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रायथ्लॉनमध्ये महाराष्ट्राला दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य

06:33 AM Jan 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
ट्रायथ्लॉनमध्ये महाराष्ट्राला  दोन सुवर्ण  एक रौप्य व एक कांस्य
Advertisement

वृत्तसंस्था/ हल्दवानी, उत्तराखंड

Advertisement

गतविजेत्या महाराष्ट्राने 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी ट्रायथ्लॉन स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्यपदकाची कमाई करीत आम्हाला ‘नंबर वन‘ का म्हणतात हे पुन्हा दाखवून दिले. महिला ट्रायथ्लॉनमध्ये डॉली पाटील हिने महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले, तर मानसी मोहिते हिने रौप्य पदकाची कमाई केली. ट्रायथ्लॉनच्या मिश्र रिले शर्यतीतही महाराष्ट्राने सुवर्णपदकावर नाव कोरले. पुरूषांच्या ट्रायथ्लॉनमध्ये पार्थ निरगे याने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राच्या झोळीत पहिले पदक टाकले.

महाराष्ट्राला 15 वर्षांनंतर पदक

Advertisement

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज (दि. 28) होणार असले, तरी 26 जानेवारीलाच ट्रायथ्लॉन (750 मीटर जलतरण, 20 किलो मीटर सायकलिंग, 5 किलो मीटर धावणे) क्रीडा प्रकाराने या स्पर्धेचा शंखनाद झाला आहे. हल्दवानी शहरातील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पुरूषांच्या ट्रायथ्लॉन स्पर्धेत मणिपूरचा दबदबा बघायला मिळाला. सरोंगबम अथौबा मैतेई याने सुवर्णपदक जिंकले, तर त्याचाच राज्य सहकारी तेलहाईबा सोराम रौप्यपदकाचा मानकरी ठरला. महाराष्ट्राच्या पार्थ निरगेला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. मात्र, त्याने तब्बल 15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या स्पर्धेत महाराष्ट्राला पदक जिंकून दिले, हे विशेष. याआधी 2013 च्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राला ट्रायथ्लॉनच्या पुरूष एकेरीत पदक मिळाले होते.

महिला गटात सलग दुसऱ्यांदा सोनेरी यश

ट्रायथ्लॉनच्या महिला एकेरीत महाराष्ट्राला सलग दुसर्या वर्षी सुवर्णपदक मिळाले. डॉली पाटील हिने एकूण 1 तास 10 मिनिटे व 03 सेंकद वेळेसह हे सोनेरी यश संपादन केले. दोघीही पुण्यातील क्रीडा प्रबोधिनीतील खेळाडू आहेत. तिचीच राज्य सहकारी मानसी मोहिते हिने रौप्यपदकाची कमाई केली. मध्य प्रदेशच्या आद्या सिंहला कांस्यपदक मिळाले. त्यानंतर महाराष्ट्राला मिश्र रिले शर्यतीतही सुवर्णपदक मिळाले.

Advertisement
Tags :

.