तिरंदाजीत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद!
अखेरच्या दिवशी महाराष्ट्राला एक सुवर्ण, एक कांस्य : टेनिसमध्ये महिला दुहेरीत गोल्ड : तायक्वांदोमध्ये पदक सप्तमी
वृत्तसंस्था/ डेहराडून
सात दिवस चाललेल्या तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी 3 सुवर्ण, एक रौप्य व एक कांस्य अशा एकूण 5 पदकांची लयलूट करीत 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. इंडीयन राऊंड प्रकारात शुक्रवारी महाराष्ट्राच्या संघाने ओडिशाचा पराभव करून कांस्यपदक जिंकले. त्यानंतर गौरव चांदणे व भावना सत्यगिरी या महाराष्ट्राच्या जोडीने इंडीयन राऊंडच्या मिश्र दुहेरीत बाजी मारत सुवर्ण पदकाने तिरंदाजी स्पर्धेचा गोड शेवट केला.
राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर ही स्पर्धा पार पडली. गौरव चांदणे (अमरावती) व भावना सत्यगिरी (पुणे) या जोडीने झारखंडच्या जोडीचा 6-2 असा पराभव करीत महाराष्ट्राला तिसरे सुवर्णपदक जिंकून दिले. महाराष्ट्राने हे सोनेरी यश संपादन केले. अमर जाधव, समीर मस्के, कुणाल तावरे व प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या तिरंदाजी संघाने हे सर्वसाधारण जेतेपद संपादन केले.
कांस्यपदकाच्या एकतर्फी लढतीत बाजी
महाराष्ट्राच्या गौरव चांदणे, रोशन सोळंके, अनिकेत गावडे व पवन जाधव या संघाने तिरंदाजीच्या इंडीयन राऊंड प्रकारात कांस्यपदकाची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राज्याच्या पदकसंख्येत भर घातली. महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्यपदकाच्या लढतीत ओडिशाचा 6-0 असा धुव्वा उडविला.
तायक्वांदोमध्ये पदक सप्तमी, मिश्र दुहेरी सुवर्णांसह 2 रौप्य, 4 कांस्य
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने तायक्वांदोमध्ये मिश्र दुहेरी सुवर्णांसह 2 रौप्य, 4 कांस्य पदकांची कमाई करीत दिवस गाजविला. वंश ठाकुर व मृनाली हर्नेकर जोडीने सुवर्ण पदकाला गवसणी घातली, स्पर्धेत दोघाचे सलग दुसरे पदक आहे. वैयक्तिक प्रकारात मृनालीने रौप्य, तर वंशने कांस्यपदक जिंकले आहे.
मानसखंड क्रीडा संकुलात सुरु असलेल्या स्पर्धेत शिवानी भिलारेने रौप्य, तर साक्षी पाटील, अभिजीत खोपडे, वसुधरा छेडे यांनीही कांस्यपदकांची लयलूट केली. मिश्र पूमसे प्रकारात वंश ठाकुर सोबत मृनाली हर्नेकरने अरुणाचल प्रदेशच्या जोडीवर रोमहर्षक मात केली. महाराष्ट्राने 8.233 गुणांची मजल घेत सुवर्णपदकावर नाव कोरले. वैयक्तिक पूमसे प्रकारात मृनाली हर्नेकरने रुपेरी यश संपादन केले. अरुणाचल प्रदेश वि महाराष्ट्राची लढत 8.232 गुणांवर बरोबरीत झाली. मात्र अरूणाचलने प्रभावी प्रदर्शन केल्याने पाँईट 1 गुणांनी महाराष्ट्राचा निसटता पराभव झाला. 57 किलो गटातील उत्तराखंडच्या पूजा कुमारी या स्थानिक खेळाडूला स्थानिक प्रेक्षकांचा सातत्याने प्रोत्साहन मिळत होते. तरीही महाराष्ट्राच्या शिवानी भिलारे हिने शेवटपर्यंत कौतुकास्पद लढत दिली. अखेर शिवानीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. साक्षी पाटील (48 किलो) व अभिजीत खोपडे (54 किलो) तर वैयक्तिक पूमसे प्रकारात वंश ठाकुर व वसुधरा छेडे या चौघांनीही उपांत्य फेरीपर्यंत मजल गाठताना सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर त्यांना कांस्यपदक बहाल करण्यात आले.
टेनिसमध्ये महाराष्ट्राची सुवर्ण यशाला गवसणी
सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्राच्या आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकर जोडीने अग्रमानांकित गुजरातला 2-0 ने नमवून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या टेनिसमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. परेड मैदानाजवळील टेनिस संकुलात झालेल्या या स्पर्धेत आकांक्षा निठुरे व वैष्णवी आडकरने एकेरीचा प्रत्येकी एक सामना जिंकला. आकांक्षाने एकेरीच्या पहिल्या लढतीत झील देसाई या आंतरराष्ट्रीय खेळाडूवर 6-3, 3-6, 6-3 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
हॉकीत महाराष्ट्राच्या महिलांनी बलाढ्या झारखंडला बरोबरीत रोखले
अनेक ऑलिंपिक खेळाडूंचा समावेश असलेल्या बलाढ्या झारखंडला गोलशून्य बरोबरीत रोखून महाराष्ट्राच्या महिला हॉकी संघाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. साखळी गटामधील या सामन्यात झारखंडचे पारडे जड मानले जात होते. त्यांनी सातत्याने धोकादायक चाली रचत तब्बल 8 पेनल्टी कॉर्नर मिळविले. परंतु महाराष्ट्राच्या संरक्षण फळीने त्यांच्या या सर्व चाली रोखण्याचा पराक्रम केला. महाराष्ट्राच्या सानिका माने, हिमांशी गावंडे व दुर्गा शिंदे यांच्यासह आघाडीच्या फळीतील खेळाडूंनी काही चांगल्या चाली करीत 3 पेनल्टी कॉर्नरही मिळाले. मात्र, यावर गोल करण्यात त्यांना यश मिळाले नाही. महाराष्ट्राचे आता चार गुण झाले असून साखळी गटातील उर्वरित सामन्यात महाराष्ट्राला मणिपूर, मिझोराम या संघांच्याही आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. या सामन्यांमध्ये विजय मिळवला, तर महाराष्ट्राला बाद फेरीत स्थान मिळवता येईल.
लवलिनाला सुवर्ण तर थापाला रौप्य
वृत्तसंस्था / डेहराडून
येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मुष्टीयुद्ध या क्रीडा प्रकारात महिलांच्या 75 किलो वजन गटात भारतातील अव्वल महिला मुष्टीयुद्धी तसेच टोकियो ऑलिम्पिक कास्यपदक विजेती लवलिना बोर्गोहेनने सुवर्णपदक पटकाविले तर पुरुषांच्या 63 किलो वजन गटात शिवा थापाने रौप्य पदक घेतले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेनंतर बोर्गोहेनची ही पहिलीच स्पर्धा होती. पहिलांच्या 75 किलो वजन गटात अंतिम लढतीत आसामच्या लवलिनाने चंदीगडच्या पी. राठोडचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकाविले. पुरुषांच्या 63.5 किलो वजन गटात शिवा थापाला अंतिम लढतीत सेनादलाच्या वंशजने 3-4 अशा गुणफरकाने पराभव केल्याने थापाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या 51 किलो वजन गटात सेनादलाच्या एम. सिंगने चंदीगडच्या अनशुल पुनियावर 4-1 अशी मात केली. महिलांच्या 60 किलो वजन गटात सेना दलाच्या जस्मिन लंबोरीयाने हरियाणाच्या मनीषा मौनवर 5-0 असा एकतर्फी विजय मिळविला. महिलांच्या बॅंटमवेट गटात साक्षीने सेनादलाला आणखी एक सुवर्णपदक मिळवून देताना हिमाचल प्रदेशच्या विनाक्षीचा 5-0 असा पराभव केला. मध्यप्रदेशच्सया दिव्या पनवारने उत्तरप्रदेशच्या सोनिया लेथरचा 4-1 अशा गुणांनी पराभव केला.