स्क्वॅशमध्ये महाराष्ट्राला सर्वसाधारण उपजेतेपद
वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ फायनलमध्ये : ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या श्वेता गुंजाळला सुवर्ण
वृत्तसंस्था/ डेहराडून
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत राहुल बैठा व अंजली सेमवाल यांना रौप्य, तर सूरज चंदने कांस्यपदक जिंकून महाराष्ट्राला स्क्वॉशमध्ये सर्वसाधारण उपविजेतेपद मिळवून दिले. राजीव गांधी स्टेडियममध्ये संपलेल्या स्क्वॅशमधील पुरुषांच्या एकेरीत महाराष्ट्राच्या राहुल याला आंतरराष्ट्रीय खेळाडू व अग्रमानांकित खेळाडू व्ही. सेंथिलकुमार याच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. चुरशीच्या लढतीनंतर सेंथिलकुमार याने हा सामना 11-6, 11-9, 11-7 असा जिंकला. या लढतीमध्ये सेंथिल कुमार याने परतीच्या फटक्यांचा सुरेख खेळ केला. राहुल याने क्रॉस कोर्ट फटके मारीत चांगली लढत दिली मात्र अखेर त्याला पराभव पत्करावा लागला.
महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला. एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6, 11-5, 11-4 असा विजय मिळवताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. अंजली हिने परतीचे काही सुरेख फटके मारले. मात्र, आकांक्षाच्या वेगवान खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही.
राहुल हा व्यावसायिक खेळाडू असून, तो जे एस डब्ल्यू वासिंद अकादमीत सराव करीत आहे. आजपर्यंत या 24 वर्षीय खेळाडूने अनेक पदके जिंकली आहेत. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या सूरजला कांस्यपदक बहाल करण्यात आले. तो देखील मुंबईचा खेळाडू असून सोमय्या महाविद्यालयात द्वितीय वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे.
महिलांच्या एकेरीत अंजली हिला गोव्याची खेळाडू आकांक्षा साळुंखे हिच्याकडून पराभव पत्करावा लागला एकतर्फी झालेल्या लढतीत आकांक्षा हिने 11-6, 11-5, 11-4 असा विजय मिळवताना चतुरस्त्र खेळाचा प्रत्यय घडविला. अंजली हिने परतीचे काही सुरेख फटके मारले मात्र आकांक्षाच्या वेगवान खेळापुढे तिला अपेक्षेइतका प्रभाव दाखवता आला नाही.
वॉटरपोलोत महाराष्ट्राचे दोन्ही संघ अंतिम फेरीत
महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघांनी वॉटरपोलोमधील आपली विजयी घोडदौड कायम राखत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक दिली. उपांत्य लढतीत महाराष्ट्राच्या महिला संघाने कर्नाटकविरुद्ध पेनल्टी शूटआऊटपर्यंत ताणलेल्या लढतीत विजय मिळविला, तर पुरुष संघाने प. बंगालला सहज पाणी पाजत रुबाबात फायनल गाठली. आता सुवर्णपदकाच्या लढतीत महाराष्ट्रापुढे महिला गटात केरळचे, तर पुरुष गटात सेनादलाचे आव्हान असेल.
महिला गटात महाराष्ट्र व कर्नाटक यांच्यातील लढत अतिशय थरारक झाली. एक एक गोलसाठी रंगलेल्या पाठशिवणीच्या खेळात 12-12 अशी गोलबरोबरी झाली. त्यानंतर महाराष्ट्राच्या मुलींनी पेनल्टी शूट आऊटमध्ये 3-0 गोल फरकाने बाजी मारत सुवर्ण पदकाची लढत निश्चित केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत केरळने बंगालचा 15-9 फरकाने पराभव केला. पुरुष गटात महाराष्ट्राने प. बंगालला 20-5 गोल फरकाने पाणी पाजून सुवर्ण पदकाची लढत निश्चित केली. दुसऱ्या उपांत्य लढतीत सेनादलाने केरळचा 14-11 गोल फरकाने पराभव केला.
ट्रॅक सायकलिंगमध्ये पुण्याच्या श्वेता गुंजाळला सुवर्ण
जेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या महाराष्ट्राच्या श्वेता गुजाळ हिने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्रॅक सायकलिंगमध्ये इलिट स्प्रिंट टू लॅपस् प्रकारात सुवर्णपदक जिंकून स्पर्धेचा सातवा दिवस गाजविला. पुण्याच्या श्वेताने अपेक्षेप्रमाणे पहिल्या झटक्यात मुसंडी मारली. मग ही आघाडी टिकवत या मराठमोळ्या सायकलपटूने सुवर्णपदकावर नाव कोरले. अंदमान निकोबारच्या सेलेस्टिनाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, तर दिल्लीची त्रिशा पॉल कांस्यपदकाची मानकरी ठरली.
तिरंदाजीत महाराष्ट्राला सुवर्ण चौकाराची संधी!
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील तिरंदाजीत महाराष्ट्राच्या महिला संघांनी अचूक वेध साधला. रिकर्व्ह व कंपाऊंड या दोन्ही प्रकारातील सांघिक गटासह रिकर्व्ह मिश्र व इंडियन मिश्र या गटातही अंतिम फेरीत मजल मारल्याने महाराष्ट्राला चार सुवर्णपदक जिंकण्याची संधी प्राप्त झाली आहे. राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या स्पर्धेतील रिकर्व्ह विभागात महाराष्ट्राने प. बंगाल संघावर 6-0 असा दणदणीत विजय मिळविला. सबज्युनिअर गटात खेळणाऱ्या गाथा खडके, वैष्णवी पवार, शर्वरी शेंडे यांनी वरिष्ठ खेळाडूंवर मात करीत महाराष्ट्राचा झेंडा फडकवित ठेवला. महाराष्ट्राला अंतिम फेरीत झारखंड संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे.
कंपाऊंड क्रीडा प्रकारामध्ये महाराष्ट्राने तेलंगणा संघावर 229-228 अशी 1 गुणांनी मात केली. जागतिक विजेती व कर्णधार अदिती स्वामीच्या साथीने मधुरा धामणगावकर, प्रितीका प्रदीप यांनी चमकदार कामगिरीचे दर्शन घडवित तेलंगणा संघाला नमवले. महाराष्ट्राला सांघिक विभागात पंजाब संघाबरोबर लढत द्यावी लागणार आहे. रिकर्व्ह मिश्र विभागात महाराष्ट्राने उपांत्य फेरीत ऑलिंपिकपटू दीपिका कुमारी हिचा समावेश असलेल्या झारखंड संघाला 5-3 असे पराभूत करीत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. शुकमणी बाबरेकर व गाथा खडके या जोडीने दीपिका कुमारी व गोल्डी मिश्रा यांचा पराभव केला.
वैयक्तिक मिडले रिलेमध्ये सान्वी देशवालचा दुहेरी धमाका
महाराष्ट्राच्या सान्वी देशवाल हिने वैयक्तिक मिडले प्रकारात आपले वर्चस्व प्रस्थापित करताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या 200 मीटर्स शर्यतीतही सोनेरी कामगिरी केली. याआधी तिने याच स्पर्धेमध्ये 400 मीटर्स वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. या सुवर्णपदकाखेरीज महाराष्ट्राने जलतरणामध्ये तीन कांस्यपदके, तर डायव्हिंगमध्येही एक कास्यपदक जिंकले.
सान्वी देशवालने दोनशे मीटर्स शर्यत दोन मिनिटे 24.90 सेकंदात पार केली. महाराष्ट्राच्या अदिती हेगडे हिने 400 मीटर्स फ्री स्टाईल शर्यतीत कांस्यपदक पटकावले. हे अंतर पार करण्यास तिला चार मिनिटे 35.34 सेकंद वेळ लागला. तिची सहकारी ऋतुजा राजाज्ञप्ने आपल्या नावावर आणखी एका कांस्य पदकाची नोंद केली. तिने 50 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यत 31.50 सेकंदात पार केली. पुरुषांच्या 50 मीटर्स बॅकस्ट्रोक शर्यतीत महाराष्ट्राच्या ऋषभ दासने कांस्यपदकाची कमाई केली. त्याला हे अंतर पार करण्यास 26.45 सेकंद वेळ लागला. महिलांच्या एक मीटर स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग प्रकारात महाराष्ट्राच्या क्षमा बंगेरा हिला कांस्यपदक मिळाले.