महाराष्ट्राचा जलतरणात पदकांचा चौकार
38 वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा स्पर्धा, उत्तराखंड 2024-25 : ऋषभ, मिहीरला रौप्य, आदिती, ओमला कांस्य
वृत्तसंस्था/ डेहराडून
उत्तराखंडात सुरु असलेल्या 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जलतरणात महाराष्ट्राने बुधवारी पदकाचा चौकार झळकावला. 3 रौप्य व 1 कास्य पदके जिंकून महाराष्ट्राने दिवस गाजविला. पुरुषांच्या गटात ऋषभ दास व मिहीर आम्ब्रे यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक पटकाविले. मुलींच्या रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्यपदक तर आदिती हेगडेला एक कांस्यपदकाची कमाई केली. सोलापूरच्या ओम अवस्थी याने दहा मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
इंदिरा गांधी जलतरण तलावावर पुण्याच्या मिहिर आम्ब्रेने पुरुषांच्या 100 मीटर बटरफ्लाय प्रकारात तर नवी मुंबईच्या ऋषभ दास याने 200 मीटर फ्रीस्टाइल प्रकारात रौप्य पदकाचा करिश्मा घडविला. नाशिकच्या अदिती हेगडे हिने महिलांच्या 200 मीटर फ्री स्टाईल प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली. नवी मुंबईच्या ऋषभ दास याने दोनशे मीटर फ्रीस्टाइल क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकले. त्याला हे अंतर पार करण्यास एक मिनिट 54.61 सेकंद वेळ लागला. आसामच्या पेगु तीर्थंका याने हेच अंतर एक मिनिट 55 सेकंदात पार करीत सोनेरी कामगिरी केली. मिहीर आम्ब्रे या महाराष्ट्राच्याच खेळाडूने 100 मीटर्स बटरफ्लाय क्रीडा प्रकारात रुपेरी यश संपादन केले. त्याला ही शर्यत पार करण्यासाठी 54.24 सेकंद वेळ लागला.
मुलींच्या चार बाय शंभर मीटर फ्रीस्टाइल रिले शर्यतीत महाराष्ट्राला रौप्य पदक मिळाले. अवंतिका चव्हाण अन्वी देशवाल, सान्वी देशवाल व अदिती हेगडे यांनी हे अंतर चार मिनिटे 2.17 सेकंदात पार केले. महाराष्ट्राच्या आदिती हेगडे हिने 200 मीटर्स क्रीडा प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली तिला हे अंतर पार करण्यास दोन मिनिटे 9.53 सेकंद वेळ लागला कर्नाटकची देसिंधु धिनिधी (दोन मिनिटे 3.24 सेकंद) व दिल्लीची भाव्या सचदेव (दोन मिनिटे 8.68 सेकंद) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदकाचा मान मिळविला. ओम अवस्थीने अप्रतिम कौशल्य दाखवीत दहा मीटर प्लॅटफॉर्म डायव्हिंग प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.
खोखोत महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची घोडदौड
हल्दवानी : गतविजेत्या महाराष्ट्राच्या पुरूष व महिला या दोन्ही खो खो संघांनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील आपली विजयी घोडदौड अपेक्षेप्रमाणे सुरूच ठेवली. महाराष्ट्राच्या पुरूष संघाने केरळाचा तर महिला संघाने पश्चिम बंगालचा पराभव करीत गटात अव्वल कामगिरी केली. पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्र संघाने केरळवर 11 गुणांनी (47-36) मात केली. मध्यंतराला महाराष्ट्राकडे 10 गुणांची (24-14) आघाडी होती. महाराष्ट्राकडून कर्णधार गजानन शेंगाळ (1.30 मि., 2 मि. संरक्षण आणि 2 गुण), राहूल मंडल (1.30 मि. संरक्षण व 10 गुण), रामजी कश्यप (1.10 मि., 1.40 मि. संरक्षण व 8 गुण), शुभम थोरात (1.40 मि., 1.25 मि. आणि 2 गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.
महिला गटातील सामन्यात महाराष्ट्र संघाने पश्चिम बंगालचा एक डाव व 4 गुणांनी (24-20) धुव्वा उडविला. या एकतर्फी विजयात प्रियांका इंगळे (2.15 मि., नाबाद 1.50 मि. आणि 6 गुण), संपदा मोरे (1.30 मि. संरक्षण आणि 6 गुण) यांनी अष्टपैलू खेळ केला.
रग्बीत महिलांची धडाकेबाज सुरुवात
डेहराडून येथे बुधवारी रग्बी स्पर्धांना प्रारंभ झाला. महिलांच्या गटात महाराष्ट्राने तामिळनाडूची 68-0 गोल फरकाने दाणादाण उडविली. एकतर्फी झालेल्या या लढतीमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी पूर्वार्धात 35-0 अशी जोरदार मुसंडी मारली होती. यानंतर तामिळनाडू संघाला जराही संधी न देता महाराष्ट्राने हा सामना एकतर्फी जिंकला.
वॉटर पोलोमध्ये दणदणीत विजय
हल्दवानी येथे सुरू असलेल्या वॉटर पोलो स्पर्धेत पुरुषांच्या गटात महाराष्ट्राने हरियाणाला 20-0 गोल फरकाने निष्प्रभ केले. एकतर्फी झालेल्या या लढतीत महाराष्ट्राच्या भूषण पाटीलने पाच गोल केले, तर सारंग वैद्यने चार गोल केले. महाराष्ट्राने वॉटर पोलोमध्ये कायमच वर्चस्व गाजविले आहे. आजही त्याचीच प्रचिती आली. सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट संगीत खेळाबरोबरच गोल नोंदविण्याबाबतही अचूकता दाखवित दणदणीत विजय मिळविला.